Friday, 13 June 2014

सुप्रभात 

रोज सकाळी उठल्यावर मला रेडीओ लावून काम करायला आवडत असलं तरी रोज जमतंच असं नाही.
नं जमायला काय झालं असं लगेच ऐकायला लागतं पण जी काही घाई , गडबड, सुरु होते की...राहूनच जातं रेडीओ लावायचं.मला कानाशी आवाज आवडत नाही तर,जवळ टेबलवर ठेवावा आणि आपली कामंही एका बाजूला सुरु ठेवावी असं मनात असतं. 
सकाळी साधारण ४.४५ पासून कोकीळ, नंतर भारद्वाज, मग बुलबुल, खार, Sunbird, कावळा,मग मांजर आणि कुत्री असे सर्व छान,खरे  आवाज ऐकण्याची सवय आमच्या कानांना झाली आहे.
त्यामुळे पाण्याचा पंप,वाहणारा नळ, गाडी पाठीमागे घेण्याचा आवाज,वहानांचे कर्णे, आणि त्यापाठोपाठ येणारा कचरा गाडीचा आवाज अशा अनैसर्गिक आवाजांचा थोडासा राग येतो.
ए खारी- खारी करत येणारा भैया किंवा जुना-पुराना-भंगारवाला,कधी भाजीवाला,हे जरी आवाज येणारच असले तरी त्यांनी थोडासा का होईना आपल्या आवाजामुळे इतरांना त्रास होऊ शकतो,व्यत्यय येतो असे लक्षात ठेवायलाच हवे.
सकाळी एक "वाघ्या" सोबतची चक्कर झाली की आमचं  वर्तमानपत्र वाचन सुरु होतं. साधारण तासभर आम्ही मराठी- इंग्रजी पेपरचा गठ्ठा पहात असतो.छान अशा सकाळी शांतपणे वाचताना तर अशा अनैसर्गिक आवाजानी वाचायच्या  तंद्रीत खंड पडतो.

अशा अनेक आवाजांच्या धडाक्यात संगीत ऐकणं मग राहून जातं. की मी ते ऐकूच नये अशी योजना रोज सकाळ करत असते..असं मला वाटायला लागलंय.
समोरच्या घरात एक दूध देण्यासाठी येणारा मुलगा तर मोबाईल वर गुजराथी / मारवाडी भाषेतली गाणी मोठया आवाजात ऐकत ऐकत सायकलवरून येतो. तो आवाज निघून जाईपर्यंत गाडी पुसायला रोज पलीकडे येणारा नेपाळी हमखास घरच्या लोकांशी  मोबाईलवर (गप्पा मारत असावा)...त्याच्या भाषेतच बोलतो.फोन कट होतो तो पुन्हा लावतो, आणि अगदी जोरजोरात बोलत असतो..गाडी पुसून होते म्हणून त्याचा आवाज ऐकू येईनासा होतो.

या सगळ्या आवाजांच्या गर्दीत सध्या नवा आवाज सुरु झालाय तो म्हणजे जवळच एक मोठ्ठं घर पाडण्यासाठी मोठीच्या मोठी,प्रचंड मशीन्स येऊन कामाला लागली आहेत. २-३ दिवसात सर्व काही जमीनदोस्त होऊन जाईल अशी अशा आहे.घर पडण्याचे आवाज तर मनालाही घरं च पडत असतात.

आता तो आवाज येणं थांबलं की आपण रेडिओवर चे निदान गाण्याचे कार्यक्रम तरी लावूनच ऐकत ऐकत काम करायचं असं मी ठरवून टाकलंय.आता जरा चिंताच वाटतीय.एवढ्या आवाजात मला रेडिओ ऐकायला मिळणार की  त्यात आणखी कोण कोणते व्यत्यय आणणारे सूर आदळून संगीत ऐकण्या पासून दूर ठेवतात !


No comments:

Post a Comment