Tuesday, 10 September 2013

काही  उत्तर आहे याला ?

परवा शेजारच्या घरातून किंवा अंगणातून मियाँव मियाँव आवाज ऐकू येत होता. जरा वेळानी आवाज बंद झालेला...की पुन्हा सुरुवात व्हायची आणि असंच सुरु..म्हणून अंगणात जाऊन..गच्चीत जाऊन कुठे पिल्लू दिसतंय का पाहिलं. तर अजिबातच नाही. मग फिस फिस करून येतंय का हे ही पाहून झालं. रात्री पाऊस सुरु झालं आणि आवाज येणं बंद झालं. वाटलं आई त्या पिलाला घेउन गेली असणार. सोमवारी सकाळी उठल्या उठल्या पुन्हा आवाज यायला लागला. आता ते पिल्लू नक्कीच अडकलेलं असणार म्हणून बंगला विकलेला असला तरी नवे लोक आलेले नाहीत रहायला.. म्हणून काकूंना फोन केला की घरी या.. पिलाचा आवाज २४ तास येतोच आहे. ....फार सांगायची गरजच पडली नाही...काका २०-२५ मिनिटांत घरी पोहचले.

आजवर कधी मुली, कधी मी, कारण झालो. पण घरात प्राणी पाहिजे कशाला म्हणत म्हणत...क्वीन माउं,गोपी,मोगली, परांजपे, अनघा,सुनील,इस्पिक अशी  नावं दिलेले आणि अनेक मियाँव करत घरी आणलेले जिव आमच्या कडचे होऊन आठवणी मागे ठेवून गेले होते.  वाघ्या तर आता आपलाच आहे असं असतांना इस्पिक ही येऊन गेला होताच..आता पुन्हा एक अध्याय सुरु होणार म्हणून पिलाला घरी आणू नये मुलींनी असं मनात येत होतं.दोघीही दिवसभर बाहेर असणार..मला बरीच कामं आहेत. नव्या जीवाची जवाबदारी नको असं मन सांगत होतं.

पण सत्तरी झालेल्या काकांना मदत म्हणून पिलासाठी कापड आणि दूध घेउन गेलेली माझी लेक हातात पिलू घेउन घरी आली.ते इतकं लहान पिलू गारठलेलं, थोडसं भिजलेलं...ओरडून थकलेलं आणि डोळ्यात जागही नसलेलं होतं. आता माझ्या दोघी लेकी त्या पिलासाठी काय काय करायला हवं विचारत त्याच्या भोवतीच बसून राहिल्या.त्याला बोळ्यानी दूध दिल्यावर ते थोडी हालचाल करायला लागलं. एका टोपलीत त्याला दिव्याजवळ ठेवून ऊब यावी म्हणून ठेवलं. 

ते कोणाच्याच मालकीचं नव्हतं. घर सोडून गेलेल्यांच्या घरात ते ही बाल्कनीत त्याची आई त्याला  विसरून किंवा मुद्दामच सोडून गेलेली होती.एक-दीड दिवस ते ओरडत असतानाही कोणी त्याला नेलं नाही...म्हणजे ते ते विसरलेलं नक्कीच नव्हतं. ते एवढं लहान की स्वतः चालत आलं आणि बाहेर पडता आलं नाही म्हणून अडकलं असंही नव्हतं. आम्हाला १२ वाजता जेवायला जायचं होतं म्हणून समोरच्या काकूंना दुपारपर्यंत त्याला ठेवण्याची विनंती करून दूध,टोपली,बोळा असं जामानिमा करून ते पाठवलं. पुन्हा संध्याकाळी शेजारच्या काकूंना विनंती केली आणि असाच बाड -बिस्तरा तिकडे पाठवला. आज सकाळी ते पुन्हा आमच्या घरी आलंय...माझी नकळतच दूध देणे लक्ष ठेवणे अशी नवी जबाबदारी सुरु झालीय. त्यला मदत घेउन दोन-तीनदा दूध दिलं पण फारसं घेत नाहीये आणि पोट तर फारच टम्म झालय त्याचं...

त्याच्यात इतर भावंडां पेक्षा काही तरी कमी होतं म्हणून आई सोडून जाते. ते नाहीतरी जगू शकणार नाही तर त्याच्यात मन कुठे गुंतवा ... असाही विचार प्राण्यांच्या बाबतीत  मी वाचल्याचं मला आठवतंय.
त्याला सोडून जाण्याचं शहाणपण त्या मांजरीला आहे म्हणायचं की जगण्याचा अधिकार काढून घेतला होता तरी आमच्या अस्वस्थ होण्यानी त्याला थोडसं का होईना जगायला मिळणार आहे ! ते खरं तर कोणाला नकळतच ओरडून थकून गेलेलं होतं. मग आम्ही त्याला जगायला भग तर पडत नाहीये ना? की मदत करू शकलो याचं समाधान मानायचं आम्ही ?