Sunday, 16 April 2023

                                                            हिरवंगार माथेरान



जवळ-जवळ वीस वर्षांनी पुन्हा एकदा माथेरानला जायचं ठरवलं. पुर्वि गेलो होतो,त्या आठवणी होत्या. अवघड वळणांचा घाट,मातीचे रस्ते, वहानांना यायला संपुर्ण बंदी वगैरे.  पर्यावरण वाचावं म्हणुन वहानांना प्रवेश नाही,त्यामुळे वहानांचे आवाज नाही,धूर नाही. माथेरान हे आशिया खंडातलं वाहन विरहित असं एकमेव पर्यटन स्थळ आहे. 

घाटाचा रस्ता चांगला मोठा केलाय, माथेरान गावातला एकमेव मुख्य रस्ता तर अगदी सिमेंटचे ब्लॉक बसवून केलाय.महिला-पुरुष आणि घोडेही माल वाहतुकीचं काम करतात. चालत जाण्याची मजा पर्यटक घेतातच पण ब्रिटिश काळात सुरु झालेल्या  रेल्वेनीही पर्यटकांना काही अंतरापर्यंत जाता येतं. घोडेही पर्यटकांना हॉटेल्समधे घेऊन जाण्याचं काम करतात. माल भरलेल्या हातगाड्या ओढणारी माणसं इथे दिसतात. सामान घेऊन जाणारे महिला-पुरुषही तुम्हाला हातात-डोक्यावर बॅगा घेऊन चालताना दिसतात.

 या पर्यटन स्थळामुळे अनेकांना रोजगार मिळतोय, पण निसर्ग जपताना माणसांची आणि प्राण्यांची भरपुर दमछाक होताना दिसते.  माणसांना मातीच्या रस्यावरुन चालण्यापेक्षा सिमेंटच्या ब्लॅाकवरुन चालणं सोपं पण घोड्यांचे त्या ब्लॅाक्समुळे खुर घसरतात, चालायला त्रास होतो असं घोडावाले सांगतात.मग समतोल कसा ठेवायचा ! 

दारूचे परवाने देताना लोकसंख्येचा विचार होतो त्यामुळे अगदी मोजक्या ठिकाणी बारमधे दारु मिळते. सर्रास सगळीकडे दारु  विक्रिला ठेवलेली दिसत नाही. हे फार चांगलं होतं. काही महिन्यांपुर्वि इ-रिक्षा सुरू केल्या होत्या,पण घोडेवाल्यांची गि-हाईकं कमी व्हायला लागल्यामुळे त्यांनी रस्ते तयार करण्याला आणि ई-रिक्षांना स्थगिती आणली. निसर्ग जपताना पर्यटकांना मात्र वातानुकुलीत खोल्या मिळतात,नृत्यासाठी काराओके संगीत लावून दिलं जातं.

 माथेरान नगरपरिषदेच्या सेवकां मार्फत घनकचरा गोळा केला जातो आणि  प्रक्रियाही केली जाते.नगरपरिषदेनी प्रत्येक रस्त्यावर कचरापेट्या ठेवल्या आहेत.दाट झाडीच्या काही वाटांना सिमेंट ब्लॅाक्स बसवलेले आहेत.

घाटातून वहानांनी पर्यटकांना सोडलं की माथेरान नगरपरिषद माणशी रु.५०/- कर घेते. तिथेच घोडेवाले, हमाल यांचे दरपत्रक ठळकपणे लावणे आवश्यक आहे. आदिवासींच्या हाताला काम, निरनिराळ्या ठिकाणांवर व्यवस्थित पाट्या-माहितीफलक,प्रेक्षणीय स्थळापासून मुख्य रस्त्यापर्यंत किती अंतरावर आपण आहोत ते समजावे अशा पाट्यांची गरज वाटली. मुख्यत: कोणती  झाडं आहेत याची माहिती, पक्षी निरिक्षणासाठी वाटाडे किंवा गाईडची सोय करता येऊ शकेल.त्यातून पर्यटकांचीही दृष्टी विकसीत होऊ शकेल.