बबिता बाई एक उदाहरण
आमच्याकडे मला सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत वरकाम करू शकणाऱ्या बाई हव्या होत्या.दुसऱ्या एका बाईना सांगून ठेवलं होतं आणि काही दिवसांतच माझ्याकडे बबिता बाई आल्या. तेव्हा कोणाकडे घरकामाला जाण्याची त्यांना सवयच नव्हती. माझं काम हे त्यांनी लोकाकडे केलेलं पहिलंच काम.बाई लातूर जवळच्या गावातून पुण्यात आलेल्या.घरी कोण कोण असतं,असं विचारलं तर एक मुलगा आणि एक मुलगी शाळेत शिकतात,गावाकडे मोठी मुलगी शिकायला आजी-आजोबांकडे ठेवली आहे असं बोलल्या.वर्षातून एकदा तरी गावी जाऊन येणं,तेवढीच सुट्टी होणार म्हणून बरं वाटलं.

नवरा ड्रायव्हर म्हणून नोकरीला आहे,तो म्हणजे त्यांचा आतेभाऊच. त्याचेही काही भाऊ आणि या बाईंचेही भाऊ ड्रायव्हिंग शिकून तेच काम इथे पुण्यात करणारे.मला फार मजा वाटली.गावाकडे शेती पहायला वडील आहेत तोवर इथे काम करायचं, पैसे हातात येतात,गावाकडेही देता येतात आणि मुलांना चांगलं शहरांत शिक्षण घेता येतं.
आमच्या भांड्यांच्या बाई नसल्या तर भांडीही घासत होत्या.कधी केराच्या बाई नसतील तर केर-फरशी पुसण्याचेही काम करायला लागल्या. पोळ्याच्या बाई सुट्टीवर जाणार आहेत म्हणताच त्यांनाच मी आधी विचारलं की करणार का पोळ्या,आणि वाघ्यासाठी भाकरी ? त्यालाही तयार.आशा त्या आमच्या घरी तीन वर्षं काम करत होत्या.नं सांगता सुट्टी घ्यायची नाही हा आमचा सर्वांसाठीच ठरवलेला नियम त्या व्यवस्थित पाळत होत्या. एका कामाची २-३ कामं आता झाली होती.शिवण शिकून त्यांनी कुणाच्या साड्या फॉल-पिको करून देणं, टिप मारून देणं,गोधडी शिवून देणं अशीही कामं सुरु केली.
आमच्या भाजी,डाळीचे दर,मुलांच्या परीक्षा,मुलीच्या लग्नाचं वय, कायदा,बँकेत पैसे ठेवणं,भिशी,अशा अनेक विषयांवर गप्पा होत असत.एकदा रविवारी त्यांच्याकडे नवरा स्वयंपाक करतो हे त्यांनी सांगितलं तेव्हां मला फारच बरं वाटलं.मग दर रविवारी आज काय करायला सांगितलं त्यांना अशी चेष्टाही सुरु झाली.
पण रोज अतिशय वेगात काम करायचं आणि निघायचं असं त्यांचं असायचं. दुपारी झोपत जा म्हणाल्यावर त्या दुपारी चण्याच्या पुड्या भरून देण्याचं काम करतात असं बोलल्या.अंगमेहनतीची कामं करता तर थोडी विश्रांती घेउन पुन्हा काम करत जा असं मी सांगत होते.कारण वाढत वाढत त्यांची ५-६ घरची कामं झाली.
आता बबिताबाई माझ्याकडे काम करतात, यालाही ७-८ वर्षं झाली.मुलगा १०वी झाला.मोठया मुलीचं लग्नं होऊन तिला दोन मुलं झाली म्हणजे चाळीशीतच त्या दोन नातवांच्या आजीही झाल्या आहेत.मुलगी आणि मुलगा शिकतोय.केर-फरशी पुसणे,धुणी- भांडी करणे,फॉंल पिको आणि ब्लाउज शिवण्याचे,पुड्या बांधण्याचे आणि एकूणच उद्योगशीलता पाहून बरे वाटायचे.
ह्या वर्षी त्यांनी स्वतः एक व्यवसाय सुरु केला याचं मला विशेष कौतुक वाटलं. त्यांनी पोळ्या-भाकरी करून देण्याचं एक सेंटर सुरु केलं आहे. त्यामुळे धावपळ फार वाढली म्हणून एका घरचं काम सोडून दिलं. एक भाड्याची खोली घेउन तिथे पोळी आणि भाकरी त्या करून देतात.त्याचे हिशोब कसे ठेवायला पाहिजेत असे सहज मी एकदा सांगितले. त्यानीही त्या पध्दतीनी हिशोब ठेऊन किती फायदा होतो आहे ते मला सांगितलं.
एक सायकल किंवा स्कूटी घेतली तर वेळ वाचेल असं म्हणताच हो,मी पण त्यासाठीच पैसे जमवणार आहे म्हणाल्या. उंची खूप असल्याने जरा अवघड जातंय पण मला वाटतंय त्या नक्की शिकतील कारण जिद्द आहे, काही करून दाखवण्याचं धाडस आहे.
परवाचीच गंमत,नेहमी हिवाळ्यात मी चूल पेटवून पाणी गरम करते. या वर्षी रॉकेल नाहीये आता पाहू असं त्यांना मी बोलले.त्यावर म्हणाल्या काही नाही कागद,नारळाच्या शेंड्या घालता त्यातच एक प्लास्टिक ची पिशवी टाकून मग पेटवा.म्हणजे सावकाश पेटत राहील आणि विझणार नाही चूल. असं अनुभवाचं शहाणपण मला देऊन गेल्या.
त्यांच्या उंचीमुळे त्यांचं व्यक्तिमत्वं आधीच विशेष वाटायचं, आता ते त्यांच्या कर्तृत्वामुळे अधिकच नजरेत भरण्याजोगं होतं आहे,यात शंका नाही.

