Saturday, 27 July 2013

 हिरवीकंच संध्याकाळ गच्चीवरची

गच्चीवरच्या बागेत प्रिया भिडे

काल मी फार छान दृश्य पाहून आले. उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी "मैत्री" सोबत काही संस्था,व्यक्ती,संघटनांनी पाठवलेली मदत आम्ही  ठेवली होती त्या भिडे हॉलमध्ये काल पुन्हा गेलो होतो. कपडे जमवले ते ही याच ठिकाणी ठेवले होते. काल  १५ टन धान्याचा ट्रक निघणार होता.  
२१ हार्मनी नावाच्या सहा मजली इमारतीत मी काही "मैत्री"च्या कार्यक्रमांना गेले होते, पण भिडे कुटुंबीय कोणीच कधी भेटले नव्हते. ते आम्हाला जागा देतात अगदी विश्वासानी, आणि आम्हीही त्या जागेचा उपयोग आवश्यक तेव्हाच करतो.

२१ हार्मनी मधे प्रथमच प्रिया भिडे भेटल्या. अतिशय सौम्य,सोज्वळ,प्रसन्न,आणि बोलकं असं व्यक्तिमत्व. मी बघुनच खूष झाले होते. त्यात  गच्चीवर केलेली बाग पहाण्याची शिरीष जोशी नावाच्या आमच्या मित्रानी कल्पना मांडली. आम्ही सगळे सहाव्या मजल्यावर असलेल्या मस्त अशा हिरव्यागार सोन्याकडे डोळे निवेपर्यंत पहात होतो.तिथे काय काय लावलेलं होतं !दुधीभोपळा,मिरची,भेंडी,रताळी,तोंडली,घोसावळी,टोमाटो,वांगी,फ्लॉवर,पालक,कोथिंबीर,अळू,आलं-लसूण. शिवाय शेवगा,पपई,राय आवळा,पेरू,अंजीर होतीच.

गच्चीत कितीतरी फुलझाडंही होती.जाई-जुई,चमेली,सोनचाफा,साधाचाफा, गोकर्ण,पानफुटी,मोगरा
ब्रह्मकमळ,अनंत,रातराणी,सदाफुली,जास्वंद,कण्हेर....आणि शोभेचीही बरीच झाडं!सर्व बाग ही ओला कचरा,पालापाचोळा,यावरच तयार केलेली आहे, हे त्यांनी अभिमानानी सांगितलं तेव्हाच समजलं.
अतिशय सुंदर बाग... जिन्यात पोती भरून भरून पाला-पाचोळा ठेवलेला होता.
फ्लॉवर

जिन्याच्या दुसऱ्या भागात गेलो आणि चकितच झालो. त्या बाजूला पूर्ण हिरवळ पोपटी रंग उधळत होती. घरचे सर्व जण सवडीने या बागेत काम करतात. अक्षरशः कचऱ्यातून सोनं फुलवणारे भिडे कुटुंबीय सर्वत्र असाच हिरवागार बगीचा फुलवू देत. जागेची कमतरता असलेले, मातीची कमी असलेले सर्व जण अशी बाग फुलवू शकतील यात काहीही शंका असली तर पिया भिडे ते ही काम करतात.त्यांची बाग बघायला जाणारे बरच जण आहेत. भिडे कुटुंबीय वड,पिंपळ,गुलमोहर अशी मोठी झाडं आर्मी,एअर फोर्स यांना देऊन टाकतात, कारण त्यांना जागेची कमतरता नसते.