Sunday, 16 April 2023

                                                            हिरवंगार माथेरान



जवळ-जवळ वीस वर्षांनी पुन्हा एकदा माथेरानला जायचं ठरवलं. पुर्वि गेलो होतो,त्या आठवणी होत्या. अवघड वळणांचा घाट,मातीचे रस्ते, वहानांना यायला संपुर्ण बंदी वगैरे.  पर्यावरण वाचावं म्हणुन वहानांना प्रवेश नाही,त्यामुळे वहानांचे आवाज नाही,धूर नाही. माथेरान हे आशिया खंडातलं वाहन विरहित असं एकमेव पर्यटन स्थळ आहे. 

घाटाचा रस्ता चांगला मोठा केलाय, माथेरान गावातला एकमेव मुख्य रस्ता तर अगदी सिमेंटचे ब्लॉक बसवून केलाय.महिला-पुरुष आणि घोडेही माल वाहतुकीचं काम करतात. चालत जाण्याची मजा पर्यटक घेतातच पण ब्रिटिश काळात सुरु झालेल्या  रेल्वेनीही पर्यटकांना काही अंतरापर्यंत जाता येतं. घोडेही पर्यटकांना हॉटेल्समधे घेऊन जाण्याचं काम करतात. माल भरलेल्या हातगाड्या ओढणारी माणसं इथे दिसतात. सामान घेऊन जाणारे महिला-पुरुषही तुम्हाला हातात-डोक्यावर बॅगा घेऊन चालताना दिसतात.

 या पर्यटन स्थळामुळे अनेकांना रोजगार मिळतोय, पण निसर्ग जपताना माणसांची आणि प्राण्यांची भरपुर दमछाक होताना दिसते.  माणसांना मातीच्या रस्यावरुन चालण्यापेक्षा सिमेंटच्या ब्लॅाकवरुन चालणं सोपं पण घोड्यांचे त्या ब्लॅाक्समुळे खुर घसरतात, चालायला त्रास होतो असं घोडावाले सांगतात.मग समतोल कसा ठेवायचा ! 

दारूचे परवाने देताना लोकसंख्येचा विचार होतो त्यामुळे अगदी मोजक्या ठिकाणी बारमधे दारु मिळते. सर्रास सगळीकडे दारु  विक्रिला ठेवलेली दिसत नाही. हे फार चांगलं होतं. काही महिन्यांपुर्वि इ-रिक्षा सुरू केल्या होत्या,पण घोडेवाल्यांची गि-हाईकं कमी व्हायला लागल्यामुळे त्यांनी रस्ते तयार करण्याला आणि ई-रिक्षांना स्थगिती आणली. निसर्ग जपताना पर्यटकांना मात्र वातानुकुलीत खोल्या मिळतात,नृत्यासाठी काराओके संगीत लावून दिलं जातं.

 माथेरान नगरपरिषदेच्या सेवकां मार्फत घनकचरा गोळा केला जातो आणि  प्रक्रियाही केली जाते.नगरपरिषदेनी प्रत्येक रस्त्यावर कचरापेट्या ठेवल्या आहेत.दाट झाडीच्या काही वाटांना सिमेंट ब्लॅाक्स बसवलेले आहेत.

घाटातून वहानांनी पर्यटकांना सोडलं की माथेरान नगरपरिषद माणशी रु.५०/- कर घेते. तिथेच घोडेवाले, हमाल यांचे दरपत्रक ठळकपणे लावणे आवश्यक आहे. आदिवासींच्या हाताला काम, निरनिराळ्या ठिकाणांवर व्यवस्थित पाट्या-माहितीफलक,प्रेक्षणीय स्थळापासून मुख्य रस्त्यापर्यंत किती अंतरावर आपण आहोत ते समजावे अशा पाट्यांची गरज वाटली. मुख्यत: कोणती  झाडं आहेत याची माहिती, पक्षी निरिक्षणासाठी वाटाडे किंवा गाईडची सोय करता येऊ शकेल.त्यातून पर्यटकांचीही दृष्टी विकसीत होऊ शकेल.

Monday, 29 January 2018

तो आला त्यानी जिंकलं !

तो आमच्याकडे आला आणि "वाघ्या" झाला.त्याला येत्या फेब्रुवारीत दहा वर्ष झाली असती.विषय निघताच डोळे पाणावतात.नको काढायला विषय म्हटलं तर तेही जमत नाही.कारण घरात,बागेत, गच्चीत, अंगणात, गल्लीत,आसपासच्या रस्त्यावर,दुकानांच्या पायरीवर,मारुती ८०० मधे, डी.पि.रस्त्याला, कासुर्डीला, एक-दोन वेळा मुळशीला... किती किती आणि कुठे कुठे तो आमच्या सोबत असायचाच.
आता मागे जाऊ तसतसं आठवणीं अक्षरशः पोतडी पोतडी साठलेल्या आहेत. तो असे पर्यंतच्या प्रत्येक दिवशी काही ना काही घटना घडत असे. पहिले दोन महिने तर प्रज्ञा-मेधा आळीपाळीनी घराबाहेर जायच्या.त्याला औषधं,जेवण-शी-शु ची सवय लागेपर्यंत दोघीही सतत त्याच्या सोबत असायच्या.तो जरा २-३ महिन्याचा झाल्यावरच त्याला आम्ही फिरायला नेणं वगैरे सुरु केलं.मुलींनी आजोबांना त्याच्यावरही एक कविता करायला सांगितलं आणि आजोबांनीही अतिशय प्रेमानी छान रचना केली.
"वाघ्या" म्हणजे धमाल असं एक समीकरणच झालं.आज काय तर त्यानी बटाटा पळवला, कधी  काय तर मैत्रिणीच्या चपलेचा अंगठा चावला,बिस्कीट देताना माझा हातच धरला, ड्रेस दातात धरून ठेवला, कमळांच्या मोठया सिमेंटच्या कुंडीत बसला आणि सगळी कमळांची रोपं  दातात धरून चावून टाकली, पाण्यात बसून राहिला.एकदा मेधाच्या मागेच लागलं,सहजच काही कारण नव्हतं-पण त्याचा तो खेळ होता.अशा अनेक गोष्टी रोज घडत होत्या.

त्याच्या पहिल्या वाढदिवसाला २००९ मधे-चक्क सोसायटीचं मैदान आम्ही घेतलं, मैदानावर ओळखीचे-अनोळखी, प्राणीप्रेमी, कुत्रा घेउन आलेले आणि ते बघायला आलेले अशी जत्राच भरली.त्यांना खाऊ देणं,भेट देणं,एकमेकांशी ओळखी करून घेणं-यात आम्ही खूप मजा घेतली.असा वाढदिवस करणार आहे हे समजल्यावर टाइम्स चे वार्ताहर आले होते.मेधा बरोबरत्याचा फोटो चक्क वर्तमानपत्रात झळकला होता."वाघ्या" रोज आम्हांला आनंद देत होता.
मुलींची स्कुटर वाजली की हा दारात स्वागताला हजर,अनिल गावाला सकाळी गेला आणि संध्याकाळी आला तरी प्रचंड आनंद,जसा काही फार दिवस अनिल भेटलाच नाहीये.

त्याच्या खाण्याच्या,खाऊच्या,खेळाच्या, बागेत चक्कर मारण्याच्या,बाहेर फिरायला जाण्याच्या वेळा ठरलेल्याच होत्या,पण कधी थोडासा उशीर झाला तर हा आमच्याकडे बघत बसणार आणि आहे ना लक्षात माझ्या वेळेचं,मग काय चाललंय तुमचं, असे त्याच्या नजरेत भाव- की आम्हीच त्याला 'हो रे जाऊया हं' वगैरे समजूत घालत बसायचो.आमच्या मनांत त्याला काय वाटत असेल हे येणं,आणि आम्ही त्याप्रमाणे वागणं...हे आमच्याही अंगवळणी पडलं होतं.वाघ्याला बोललेलं समजतं असं आमच्या लक्षात येत होतं.सहजच एकदा मी शब्द लिहून काढले तर २०० पेक्षाही जास्त शब्द झाले.
त्याच्या वयात येण्याची कोण चर्चा...वधू संशोधन,त्याचं मैत्रिणीला भेटणं,मग एकीची पिल्लं,दुसरीची पिल्लं.असंख्य फोटो,चर्चा,मित्र-मैत्रिणींना सांगणं.कोणीही कुठेही गेला कि वाघ्याला हे आणलं,ते आणलं असायचंच.किती तरतऱ्हेचे पट्टे,कॉलर,भांडी, सगळं त्याच्यासाठी चालू असायचं.
२-३ वर्षांपासून त्याला काही तरी किरकोळ व्हायचं, डॉक्टरांनी बघून गेलं,कि औषधं सुरु व्हायची,हा बरा व्हायचा.केक मधून,केळ्यामधून औषधं,आईस्क्रीम देणं,असे लाड सुरूच असायचे.आता मात्र तो फार लवकर बरा दिसेना,कातडीवर जरा जास्तच चट्टे दिसायला लागले होते.त्याला काही त्रास होऊ नये हे मात्र वाटायचंच.

आम्हांला काय वाटतं आणि त्याला काय समजतं यात आम्ही कधी पडलोच नाही. आम्ही बोलत होतो,तो त्याचा अर्थ समजो किंवा नसेल समजलं तरी प्रतिसाद देत होता. कधी भुंकून,कधी शेपूट हलवून तर कधी शोध शोध असा शब्द ऐकून- ताबडतोब त्याच्या खाऊच्या कपाटाशी जाऊन आमची वाट पाहून.

त्याला जे म्हणायचं होतं, ते तो सांगत असेल.पण ते आम्हांला नाकारायचं असावं.त्याला आमचा, 'त्याच्या आमच्या' झालेल्या जगाचा निरोप  घ्यायचा आहे,हे तो सांगण्याचा प्रयत्न करत असेलही. आम्ही ते ऐकायला मानायला तयार नव्हतो किंवा समजूनही नं समजल्यासारखं करत होतो! खरं पचवता येत नाही म्हणून त्याच्या सुचवण्याकडे जरा दुर्लक्ष करत होतो?  मला आता तेच कबुल करायला लागणार आहे.कारण त्याला फसवून कधीच चालत नव्हतं. आमच्या मनातलं  त्यालाही कळलंच होतं.त्यानी शनिवार रात्र,सर्व जण सोबत,बाबा घरात,मेधा ही आठ दिवसांनी आली-तिला भेटून मगच निरोप घेतला.































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































a









































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































.

Friday, 11 August 2017

पालकांची शाळा

पालकांची शाळा

                    आपली मुलं- मुली ही आपली असतात. त्यांना कसं वाढवायचं हे आपण पालक ठरवत असलो तरी, अनेक गोष्टींचा त्यांच्या वाढीवर नकळत परिणाम होत असतो.पाळणाघर,घरातले सर्व मदतनीस,नातलग,भवताल,मित्र-मैत्रीणी,शिक्षक,शिक्षण,पुस्तकं,त्यांना आपणच आणलेले काही खेळ,त्यांच्याशी मारलेल्या गप्पा,सिनेमा,मालिका,पाहिलेली ठिकाणं, सगळ्याचा त्यांच्यावर-त्यांच्या मनावर काही नं काही ठसा उमटलेला असतो. एखाद्या मुलावर जसा परिणाम झाला तसाच इतर मुलामुलींवरही होईल असं मात्र अजिबात नाही.त्याच पालकांची मुलं,एकाच घरातली भावंडंही नाही का वेगवेगळी असतात!
                    माझ्या कामा दरम्यान पालकांशी झालेल्या अनेक चर्चांची आठवण होते. शाळा बदलली आणि वेदांत बदलला असं संगीता म्हणत होती.वारंवार दाखले देत होती.त्याच्या शाळेच्या वेळा पाहून तिनी कामाच्या वेळा ठरवल्या होत्या. त्याच्याशी सहजपणे बोलता यावं,त्याच्या मनांत काय चाललंय ते सहज समजावं असा हेतू ठेवून तिचे प्रयत्न सुरु होते.मोठया शाळेत जायला लागलाय तसा अनेक गोष्टी नव्यानी पहायला लागलाय,ऐकायला लागलाय आणि त्यामुळे त्याचं वागणं बदलतंय हे तिच्या लक्षात येत होतं. मुलांसमोर नवनव्या गोष्टी जाणीवपूर्वकच समोर येतील असा प्रयत्न पालकांना करावा लागतो. पण मुलांनी नवीन काय पाहिलं असावं याची कल्पना तर नक्कीच येते,ना! ते भान असणारे पालक समजून-उमजून मुलांशी बोलत राहिले तर होणारा परिणाम निश्चितपणे वेगळा असतो. मुलांना काय आणि कधी, समोर ठेवायचं याचा डोळस विचार करणारे पालक मला क्वचितच भेटतात.एक अभ्यासक म्हणून मी पालकांचाही अभ्यास करत असते. बारकाईनी निरीक्षण करते. तेव्हां दरवेळी लक्षात येतं हे, की पालकांनी पालक होण्यासाठी काहीही प्रशिक्षण घेतलेलं नसतं, नव्हे त्याची काही गरज नाही असंही बोलताना मी ऐकलय.          
                    एका नावाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेनी, त्यांच्या विद्यार्थ्यांनी, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत जाऊन मुलां-मुलींना काही सांघिक खेळ, गाणी शिकवायची असा उपक्रम ठरवला. पालक सभेमध्ये मग त्यावर बरीच चर्चा, वाद-विवाद, काही पालकांनी नाराजीही दाखवून झाली. पण शाळेचा निर्णय होता, त्याला विरोध नं करता घरीही काय बोललं जावं, विचारलं जावं-तेच सांगण्यासाठी पालकसभा बोलावली होती.नंतर मुलांशी सविस्तर बोललं जाणार, ऐकूनही घेतलं जाणार असाच हेतूपूर्वक आखलेला उपक्रम होता. मुलांना खूप काही शिकायला मिळाल्याचं सर्व शिक्षकांनी आणि काही पालकांनीही सांगितलं.
                    एक पालकांचा गट तर कायमच त्या शाळेत जात रहायचं,म्हणजे आपणही मुलांसारखं एक वेगळं नं पाहिलेलं जग बघू असं ठरवून शाळेकडे आला आणि एक वेगळाच उपक्रम त्यातून सुरु झाला. अर्थातच त्या घरांमधे मुलांनाही नवनवीन गोष्टी समोर येत राहिल्या,नकळत वेगळं समजत गेलं,प्रश्न पडत गेले,आणि शिकण्याला पुस्तकच नाही तर भवतालची परिस्थिती डोळसपणे बघण्याची एक समज आली.
                    वर्गांत असणारी मोजकी अपंग मुलं, सर्व वर्गाला असंच सहजपणे शिकवत असतात, पण त्यावर पालकांशी मोकळा संवाद झाला तरच ते घरात समजतं. अशा विशेष क्षमता असलेल्या मुलांशी कसं वागायचं, सहानुभूतीची त्यांना गरज नसते तर त्यांना समजून घ्यावं  एवढंच! घरात पालकांकडून मुलांशी बोलणं म्हणजे जर होमवर्क,ट्युशन्स,प्रोजेक्ट्स,परीक्षा,ट्रीप एवढंच असेल तर झालंच. मग मुलं शाळेत इतर बरंच शिकत असतात, ते कसं शिकतायत हे कसं समजणार?
                    अगदी टीपकागदा सारखं मुलं पट्कन टिपत असतात. खूप अनुकरण करत असतात. एकदा माझी मुलगी शाळेतून आल्यावर पाय धुणार पण हाताचा वास जातो, हात धुणार नाही म्हणाली. चमच्यानीच खाता येईल असं दे हे ही वर सांगून झालं. बोलता बोलता गप्पातून समजलं की रिक्षातल्या मोठया मुलांचं पाहून सगळीच मुलं पेट्रोल पंपावर रिक्षा थांबली की पेट्रोलचा थेंब हातावर घेतात. तो वास छान असतो असं ती म्हणतात. तो वास जाऊ नये म्हणून हात धुवायचा नाही असं त्यांनी सांगितलं होतं. पेट्रोलमध्ये असं काय असतं की त्याचा वास येतो, तसा कशाकशाला वास येतो, कोणकोणते वास कोणाला आवडतात,वास तयारही करता येतात,वास घेण्याचं कसं एक मोठ्ठ कामही अनेक लोक करतात,कुत्रे वास घेतात आणि चोरही शोधतात वगैरे खूप  गप्पा होऊन विषय बराच रंगला. पेट्रोलचा वास आणून हात नं धुणं कधीच थांबलं आणि उलट त्यावर विनोद सांगणं सुरु झालं. थेट नकारही नं देता,नं रागावता एक प्रश्न सहज सोडवला होता आणि वर बरीच माहितीही करून देता आली.
                    एकदा शेजारची मुलं खेळताखेळता दिवाळीच्या सुट्टीत कुठे जाणार,यावर त्यांची बडबड सुरु होती. एक मुलगी बाबांबरोबर बोटीवर जायचंय-खूप मजा येईल,कुठे जाणार ते मात्र नाही माहिती म्हणत होती. तिची मैत्रीण मात्र उटीला,त्या अमुक तमुक गाण्याचं शुटींग नाही का झालं, तिथे जाणार असं सांगत होती. अशावेळी आमच्या बाई नकाशा घेउन बसायला लावायच्या. कोणीही कुठे जाणार असलं तरी अख्ख्या वर्गाला कशी माहिती आपोआपच व्हायची,तिथे काय पहायचं तेही सांगायच्या त्याची आठवण झाली.
                    मराठी माध्यमाच्या शाळेत मुद्दाम प्रवेश घेतलेला माझा भाचा एकदा सांगत होता. सरांनी वर्गात विचारलं,की कोणाकोणाचे बाबा-आई, मावशी,मामा,सिग्नल लाल असतांनाच निघतात,की हिरवा झाल्यावर ते सांगा. मुलंच ती खरंखरं बोलली.तेवढ्या मुलांच्या घरी चिठ्ठीवर लिहिलेला निरोप गेला की नियम मोडण्यासाठी नसतात. व्यवस्था ही सर्व सुरळीत चालावं,अपघात होऊ नये यासाठी असते. ते वर्गात मुलांना म्हणायचे की माणुसकीचे धडे-नागरिकशास्त्र, हे काही बसवूनच शिकवलं पाहिजे असं नाही. मोठया माणसांकडे नीट पहा,त्यांच्याही कडे पाहून खूप शिकता येतं. म्हणजे पालकांचं वागणं कसं असायला पाहिजे  आणि कसं असतं !
                    संगीता म्हणत होती की मोठया शाळेत सोमवारी खूप मुलांच्या डब्यात पिझ्झा-बर्गर असलंच असतं,शाळेच्या बसमध्ये मॉलला जाऊन आल्याच्या गप्पा असतात, तेव्हापासून वेदांग आपण का जात नाही,लोक जातात वगैरे बोलायला लागलाय. तुलना सुरु असते सारखी. एकदा तर त्या मॉलच्या आत मुलांना गेम्स खेळता येतात हे ऐकून तो आजच जायचं नाहीतर मी जेवणार नाही बोलायला लागला. संगीता जे सांगत होती,तिच्यासारखंच बाकीच्याही सांगायला लागल्या. नाही ऐकायची सवयच राहिली नाहीये हल्ली मुलांना. पण ती लावत नाही आपणच ना ! आपण लागतील त्या गोष्टी लागतील तेव्हां नक्की घेऊया. पण मॉल बघायला जायला काहीच हरकत नाही, हे सांगितलं तर काहीच हरकत नाही.

                    मुलांनो मार्क मिळवताना जी मुलं जास्त मार्क मिळवतात त्यांच्याकडे बघा,पण चैन करतांना -मजा करतांना ज्यांना एवढीही मजा करता येत नाही त्यांची आठवण ठेवा असं सांगण्याची एक पद्धत होती. ती गेली की काय,फक्त तुला जे जे हवं ते मिळव आणि कसंही करून मिळव असं रुजतंय की काय!
                    आपल्याला वाढवताना या महिन्यात आता जरा खर्च बेतात कारण दिवाळी येतीय...पाहुणे येणार आहेत,सुट्टीला जायचं ना आजी-आजोबांकडे असे संवाद घराघरांतून होत असत. त्यांत कमीपणाची भावना नसायची. मीनल आठवून सांगत होती,दादाला या महिन्यात सायकल घेतलीय,तर तुम्हाला दोघींना काहीतरी खेळ घेऊया, काय घ्यायचा ते तुम्ही ठरवून ठेवा हे ऐकल्यावर जे काय वाटलं होतं ना ! असूया,स्पर्धा,चढाओढ या नैसर्गिक भावना आहेत आणि राहणारच. पण पालक त्यावर त्या त्या वेळी समजून मार्ग काढतात.फक्त मुलांना असुरक्षित वाटायच्या आत त्यावर मुलांशी बोललं गेलं पाहिजे-ते ही जाणीवपूर्वक.
                    आम्ही खेळताना काय काय बोलतो याच्याकडे लक्ष द्यायची जवाबदारी आम्हांला सांभाळायला येणारी बेटी मावशी हिच्यावर होती. आम्हांला ते खूप दिवसांनी समजलं. कारण एकदा अर्जुन आणि प्रणिता बोलतांना आपण घरातून गुपचूप पैसे आणांयचे मग पेप्सीकोला खायचं असे बोलले होते. मला वाटलं आता ते पैसे आणतील आणि खातील पेप्सीकोला ! पण दोन दिवस काही त्यांनी घेतला नाही,मग मी विचारलं तर त्यांनी ठरवलेलं त्यांच्या आईला समजलं होतं आणि आईनीच एकदम विचारलं की पेप्सीकोला कोणाकोणाला आवडतो,आणणार आहे ती घरी येतांना त्यामुळे पैसे घ्यावेच लागले नाहीत.

                    हल्ली हल्ली एक नवीनच खूळ शाळेच्या बसमुळे ऐकू येतंय. कोणाकोणाची आई त्यांना मोबाईल देते,शाळेत चालत नाही तर गुपचूप दप्तरातून आणतात,आणि बसमधे त्याच्यावर खेळतात. एका मुलीनी तर खूप भारी फोन आणला,त्यांत उघडी मुलं-मुली ती पहात आणि दाखवत होती.मग बसमधून उतरल्यावर रमतगमत घरी जायचं-सुरु झालं. आईला रजा काढून घरी थांबल्यावर ते लक्षात आलं. तेव्हापासून मोबाईल देणंही बंद झालं.तीचा एकटीचाच मोबाईल नाही तर शाळेत येतांनाच दप्तरं तपासूनच आत घ्यायला सुरुवात झाली. मोबाईल आणला असेल तर तो प्रिन्सिपॉल कडे ठेवून मग पालकांना बोलावून त्यांनाच देणं सुरु झालं.ही शिस्त शाळेनी ठरवलेली होती आणि त्याला शासनही होतं. तरीही वर्गांत लहान वयात मोबाईल वापरण्याचे परिणाम समजेल अशा भाषेत सांगितले गेले होते.
                    मुलं काय विचार करतात आणि कसा विचार करतात,हा खरोखरीच अभ्यासाचा विषय आहे. गौरी अचानक म्हणायला लागली की मी तुमची नावडती आहे ना,म्हणूनच तुम्ही माझे लाड करत नाही.हा विषय कसा आला मनांत,यावर मग घरात विचार सुरु झाला. काकूंनी सांगितलेली आवडती-नावडतीची गोष्ट असेल की काही कानावर आलेलं अर्धवट ऐकलेलं असेल. पण त्यावर मधूनच विचारत रहाण्या ऐवजी  आईनी सरळ गौरीला सांगितलं ते फार बरं झालं.आम्हांला एक बाळ आवडलं म्हणून तर आणलं दवाखान्यातून,आणि गौरी नाव तर आमचं खुपच आवडीचं,मग नावडती कोण गं असणार? असुरक्षित का वाटत असेल तिला? कदाचित हट्ट केला, रागावून घेतलं की मग लहान मुलं सुद्धा अशी काही अस्त्र वापरतात. त्यांच्याकडे लक्ष वेधून घेतात. त्याकडे दुर्लक्ष नं करता ते अस्त्र वापरणं हा स्वभाव तर बनत नाही ना हे मात्र सावधपणे पहायला लागतं.
                    सावी सतत बाहुल्या घेउन खेळायची.त्यांच्याशी बोलायची. बाहुली आजारी आहे,झोपली आहे,तिला कपडे आणायचे,अगदी डायपर्स सुद्धा..आणायचेच, हे ठरून गेलेलं होतं. आसपासच्या तिच्या वयाच्या मुलात मात्र अजिबातच खेळायला जायचं नाही. आठ वर्षाच्या सावीचा हा हट्ट बंद व्हावा यासाठी घरात काही ना काही प्रयत्न सुरु होते. पण ही समस्या आहे,दोन्ही पालकांनी एकत्र निर्णय घेउन थोडा कठोर निर्णय घेतला पाहिजे,हे सांगेपर्यंत खेळणं बंद होत नव्हतं. ते सुरूच राहिलं तर ती खोट्या आभासी दुनियेत रमत राहील हे काही बरोबर नाही हे सांगितल्यावर मात्र सावी सोबत वेळ घालवण्याचे अनेक मार्ग पालकांनी शोधले.परीराणी,जादूगार,कॉमिक्स,स्वप्नमय जग याची गंमत आहेच पण त्याला मर्यादा आहेत.
                    कुटुंब न्यायालयात पालक त्यांच्याच मुलांना भेटायला येतात आणि तिथे पालक होणं म्हणजे काय तेच नं कळून फक्त मुलांना खेळ,भेटवस्तू,चोकलेट-बिस्किटं देत बसतात. मुलांना यांतून काही वेगळं वळण लागेल हा विचारही ते करत नाहीत. किती साधं,सहज देता येणारी गोष्ट खरं तर मुलांना दिली तरीही आवडते. विशिष्ट वयाच्या मुलांच्या पालकांकडून काय अपेक्षा असतील हा विचार जरी पालक करत असते तर एवढे समस्याग्रस्त पालक आणि मुलंही बघायला मिळाली नसती.
                           पालक बाहेर जातात,पैसे मिळवतात,घरातल्या सगळ्यांसाठी,अडीअडचणीसाठी ते ठेवायला लागतात. चैन आपल्याला रोज करता येणार नाही हे सांगून मुलांची समज वाढेलच. मग त्यांना ‘नाही’ म्हणायला पालक घाबरतात की काय? आपलं बाहेर रहाणं,मुलांना कमी वेळ देणं याची भरपाई म्हणून वाट्टेल ते हट्ट पुरवतात असं एक निरीक्षण आहे. सुगंधा तर म्हणते, आमच्या लहानपणी जे आम्हांला मिळालं नाही ते आम्ही मुलांना सगळं देणार असं ठरवलंय! अहो देणार देणार जे म्हणताय नां ते प्रेम,विश्वास,सोबत,संस्कार,गप्पा,आवश्यक तेव्हाच मदत,या ही गोष्टी मुलांना द्यायच्या असतात. व्यवहारी जगाची ओळखही करून द्यायची असते. सजग असं नागरिक म्हणून त्यांना आपण तयार करायचं असतं. ते त्यांना आयुष्यभर उपयोगी होईल. मोबाईल,गेम्स हे वेळ घालवायला,आणि काहीच करायचं  नाही,करता येत नाही त्यांना सोबत करतील पण मुलांना मात्र आजारच देतील.


                    रोजच्या वर्तमानपत्रात पळून गेलेली मुलं,त्यांच्या आत्महत्या,वाढती गुन्हेगारी, एकलकोंडेपणा,नैराश्य अशा असंख्य बातम्यां आपण वाचतोय. मग मुलांना दोष देऊन आपण सुटका करून घ्यायची? अजिबातच नाही. पालक म्हणून आपणच चुकतोय का हे तपासून पहायला हवं. बदलही करायला-पुरेसा विचार करायला पाहिजे,तज्ञाची मदत घ्यायला पाहिजे. हे आपणच करायचं कारण मुलं आपलीच आहेत.

Friday, 16 December 2016

बबिता बाई एक  उदाहरण


                 आमच्याकडे मला सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत वरकाम करू शकणाऱ्या बाई हव्या होत्या.दुसऱ्या एका बाईना सांगून ठेवलं होतं आणि काही दिवसांतच माझ्याकडे बबिता बाई आल्या. तेव्हा कोणाकडे घरकामाला जाण्याची त्यांना सवयच नव्हती. माझं काम हे त्यांनी लोकाकडे केलेलं पहिलंच काम.बाई लातूर जवळच्या गावातून पुण्यात आलेल्या.घरी कोण कोण असतं,असं विचारलं तर एक मुलगा आणि एक मुलगी शाळेत शिकतात,गावाकडे मोठी मुलगी शिकायला आजी-आजोबांकडे ठेवली आहे असं बोलल्या.वर्षातून एकदा तरी गावी जाऊन येणं,तेवढीच सुट्टी होणार म्हणून बरं वाटलं.

नवरा ड्रायव्हर म्हणून नोकरीला आहे,तो म्हणजे त्यांचा आतेभाऊच. त्याचेही काही भाऊ आणि या बाईंचेही भाऊ ड्रायव्हिंग शिकून तेच काम इथे पुण्यात करणारे.मला फार मजा वाटली.गावाकडे शेती पहायला वडील आहेत तोवर इथे काम करायचं, पैसे हातात येतात,गावाकडेही देता येतात आणि मुलांना चांगलं शहरांत शिक्षण घेता येतं.

आमच्या भांड्यांच्या बाई नसल्या तर भांडीही घासत होत्या.कधी  केराच्या बाई नसतील तर केर-फरशी पुसण्याचेही काम करायला लागल्या. पोळ्याच्या बाई सुट्टीवर जाणार आहेत म्हणताच त्यांनाच मी आधी विचारलं की करणार का पोळ्या,आणि वाघ्यासाठी भाकरी ? त्यालाही तयार.आशा त्या आमच्या घरी तीन वर्षं काम करत होत्या.नं सांगता सुट्टी घ्यायची नाही हा आमचा सर्वांसाठीच ठरवलेला नियम त्या व्यवस्थित पाळत होत्या. एका कामाची २-३ कामं आता झाली होती.शिवण शिकून त्यांनी कुणाच्या साड्या फॉल-पिको करून देणं, टिप मारून देणं,गोधडी शिवून देणं अशीही कामं सुरु केली.

आमच्या भाजी,डाळीचे दर,मुलांच्या परीक्षा,मुलीच्या लग्नाचं वय, कायदा,बँकेत पैसे ठेवणं,भिशी,अशा अनेक विषयांवर गप्पा होत असत.एकदा  रविवारी त्यांच्याकडे नवरा  स्वयंपाक  करतो हे त्यांनी सांगितलं तेव्हां मला फारच बरं वाटलं.मग दर रविवारी आज काय करायला सांगितलं त्यांना अशी चेष्टाही सुरु झाली.
पण रोज अतिशय वेगात काम करायचं आणि निघायचं असं त्यांचं असायचं. दुपारी झोपत जा म्हणाल्यावर  त्या दुपारी चण्याच्या पुड्या भरून देण्याचं काम  करतात असं बोलल्या.अंगमेहनतीची कामं करता तर थोडी विश्रांती घेउन पुन्हा काम करत जा असं मी सांगत होते.कारण वाढत  वाढत त्यांची ५-६ घरची  कामं झाली.

आता बबिताबाई माझ्याकडे काम करतात, यालाही ७-८ वर्षं झाली.मुलगा १०वी झाला.मोठया मुलीचं लग्नं होऊन तिला दोन मुलं झाली म्हणजे  चाळीशीतच त्या दोन नातवांच्या आजीही झाल्या आहेत.मुलगी आणि मुलगा शिकतोय.केर-फरशी पुसणे,धुणी- भांडी करणे,फॉंल पिको आणि ब्लाउज शिवण्याचे,पुड्या बांधण्याचे आणि एकूणच उद्योगशीलता पाहून बरे वाटायचे.
ह्या वर्षी त्यांनी स्वतः एक व्यवसाय सुरु केला याचं मला विशेष कौतुक वाटलं. त्यांनी पोळ्या-भाकरी करून देण्याचं एक सेंटर सुरु केलं आहे. त्यामुळे धावपळ फार वाढली म्हणून एका घरचं काम सोडून दिलं. एक भाड्याची खोली घेउन तिथे पोळी आणि भाकरी त्या करून देतात.त्याचे हिशोब कसे ठेवायला पाहिजेत असे सहज मी एकदा सांगितले. त्यानीही त्या पध्दतीनी हिशोब ठेऊन किती फायदा होतो आहे ते मला सांगितलं.
एक सायकल किंवा स्कूटी घेतली तर वेळ वाचेल असं म्हणताच हो,मी पण त्यासाठीच पैसे जमवणार आहे म्हणाल्या. उंची खूप असल्याने जरा अवघड जातंय पण मला वाटतंय त्या नक्की शिकतील कारण जिद्द आहे, काही करून दाखवण्याचं धाडस आहे.
परवाचीच गंमत,नेहमी हिवाळ्यात मी चूल पेटवून पाणी गरम करते. या वर्षी रॉकेल नाहीये आता पाहू असं त्यांना मी बोलले.त्यावर म्हणाल्या काही नाही कागद,नारळाच्या शेंड्या घालता त्यातच एक प्लास्टिक ची पिशवी टाकून मग पेटवा.म्हणजे सावकाश पेटत राहील आणि विझणार नाही चूल. असं अनुभवाचं शहाणपण मला देऊन गेल्या. 
 त्यांच्या उंचीमुळे त्यांचं व्यक्तिमत्वं आधीच विशेष वाटायचं, आता ते त्यांच्या कर्तृत्वामुळे अधिकच नजरेत भरण्याजोगं होतं आहे,यात शंका नाही.

Wednesday, 30 November 2016


               आशाताई एक निराळं व्यक्तिमत्व

एक वर्ष होऊन गेलं,मला इथे लिहून !मला लिहायला आवडतंय हे कळून इतकी वर्ष झाली पण का कोण जाणे, नियमितपणा प्रत्येक बाबतीत असायला हरकत नाही हे कळत असून वळत मात्र नाही. आज मात्र राहावेना !त्याला कारणही तसंच झालंय !
आमच्या मंडळातल्या एक उत्साही आजी आता आम्हांला पुन्हा भेटणार नाहीत.
              काल दुपारी मला फोन आला आणि आशाताई चक्रदेव (आजी) गेल्याचं समजलं. तेव्हापासून सतत त्यांच्या आठवणी येत होत्या. त्या गेल्या ते वय  झालं म्हणून ! ९३ वर्षं पूर्ण करणार होत्या.त्यांना कमी ऐकू येत होतं.कंपवात थोडाथोडा जाणवतो आणि तोलही जातो अशी सारखी भीतीही वाटते,म्हणायच्या.
            १५ दिवसांपूर्वीच आजोबा वारले. अगदी त्याच दिवशी संध्याकाळी आजीना दवाखान्यात न्यावं लागलं. नंतर हळुहळू दिवा मंद होत जावा तसं दवाखान्यात त्यांचं सुरु झालं होतं. चक्रदेव आजोबांच्या पाठोपाठ  बरोब्बर १५ दिवसांनी आशाताईनीही हे जग सोडलं आहे.त्या दोघांचं ७५ वर्षांचं एकत्र राहणं झालं, असं समजलं तेव्हा मनात आलं,की ते नाहीत तर आशाताईंचा जगण्याचा उत्साहच संपला की काय ! श्री.चक्रदेव आजोबा येत्या ८ डिसेंबर ला ९८ वर्षाचे होणार तर वाढदिवस साजरा करावा असं त्यांच्या मनात होतं. 
            मी एकदाच त्यांच्या घरी गेले होते. स्वतंत्रपणे दोघंच रहात होते. या वयातही किती प्रसन्न चेहेरा. आजोबा रोज जवळच फिरायलाही जायचे.अगदी वयाच्या ९४-९५ वयापर्यंत.पण एकदा काय कारण झालं नाही माहिती, पण ते फिरताना दिसणं बंद झालं.  त्यांना पाहून फार छान वाटायचं.त्यांच्या घरात एखादी मदतनीस बाई, एखादी विद्यार्थिनी सुद्धा राहत होती, ते त्यांना सोबत म्हणून!
त्यांनी पूर्वी वनिता समाजात काम केलं होतं, आणि त्यामुळे आमच्या मंडळाची नियमावली त्यांनी लिहिली होती.हे समजल्यावर मी अध्यक्ष होताच त्यांनी मला एकदा ते नियम सांगते,पण तुम्हीच या घरी म्हणाल्या. मग मी आणि उपाध्यक्ष मैत्रीण गेलो होतो.घर अगदी नीट लावलेलं,त्यांचं स्वच्छते कडेही लक्ष असणार हे घरात गेल्यावर लगेच जाणवलं होतं. पाणी, अल्पाहार,सरबत सर्व ठरवून,बाईकडून नीट करून घेतलेलं. पण बारकावा लगेच लक्षात येण्याजोगा.त्यांच्या जेवण-झोप या वेळा ठरलेल्या,आणि त्या त्या नक्कीच पाळत असणार.कारण आमची वेळ ठरवताना तसं त्या म्हणाल्याही. 
                 स्वच्छ साडी,नेहेमी नीट घेतलेला पदर !चैत्रागौरी  च्या हळदी-कुंकवाच्या दिवशी तर छान वेगळं कानात,गळ्यात आणि सिल्क ची साडी नेसून त्या आलेल्या आठवतात.कार्यक्रमाला जरी उशिरा आल्या तरी त्यांना ऐकू कमी येई म्हणून त्यांना पुढेच जागा करून देण्याचं मंडळात नेहमीच ठरलेलं होतं.चिठ्ठी उचलून  दिलेल्या विषयावर उत्स्फूर्त बोलणं असो की, एखादा गाण्याचा कार्यक्रम,त्या प्रार्थना होईपर्यंत थांबत,आणि न्यायला बाई येतील तेव्हाच घरी जात असत.
आमच्या वयात एवढं अंतर की त्यांची नातसून साधारण माझ्या एवढी असेल.ती गाण्याचा कार्यक्रम करणार आणि मंडळ शक्य असलेला आणि बाकी मी खर्च करीन असं त्यांनी वर्षभर आधी सांगून ठेवलं होतं.कार्यक्रमाच्या दिवशी नातसूनेच्या कौतुकासाठी  महिला मंडळात आजोबा आलेले चालतील का असं विचारणारा फोन त्यांनी मला केला .अर्थातच जरूर येऊ दे त्यांना. असंच आम्ही सांगितलं.त्यांना ठरवल्याप्रमाणे कार्यक्रम झाला याचं फार फार बरं वाटलं होतं.तब्बेत बरी नसेल तरच त्या मंडळात येत नसत.पण हल्लीच मला कधी कधी जमत नाही असंही सांगत.एकदा तर मैदानावर खेळ घेतले होते,त्या काय खेळणार मी असं म्हणत घरी बसून राहिलंय नाहीत. कुठे होतं आता मैदानावर जाउन येणं,असं म्हणत येऊन बसल्या होत्या.कायम अगदी  नीटस राहणं, मोजकं बोलणं, आणि मुख्य म्हणजे स्वतः बद्दल कमीत कमी बोलणं,अशा विशेष गुणांमुळे त्या माझ्या नेहमीच आवडत्या सभासद होत्या.त्यांच्या आठवणी नाहीत कारण फार सहवासही नाही. पण डोळयांसमोरत्यांचं व्यक्तिमत्वं मात्र सारखं येतंच राहिलं आहे. त्यांचं नीटस,सौम्य स्वभाव आणि ठरवल्याप्रमाणेच करत राहणं हे जमवण्यासाठी त्यांचे आशिर्वाद हवेत.

Wednesday, 25 November 2015

आम्ही मैत्रीणी 

आमच्या ठिकठिकाणी बदल्या,शिक्षण आणि वास्तव्य यामध्ये  अनेक मित्र-मैत्रिणींशी संपर्कात रहाताच आलं नाही याची नेहमी खंत असें. बदली झाली की सगळं नव्या ठिकाणी नव्या उत्साहात सुरु करण्याचीही मजा असें.अशाच एका मैत्रिणीला कसं भेटता येईल असा विचार मनात येऊनही गेला आणि मागे पडला होता. 
खरं तर मी शाळेत आणि ती कॉलेजमध्ये,वयात अंतर,पण फिरायला जाणं, घरच्या काही कामांसाठीही एकत्र बाहेर जाणं, गच्चीवर चांदण्यात एकत्र जेवणं, कोजागिरी, सुट्टीत पत्ते, अशा अनेक कारणांनी सारखंच भेटायचो. अगदी २-३ वर्षं आम्ही क्वार्टर्स मधे खाली-वर राहणारे नंतर मात्र ३०-३२ वर्षात एकदाही भेटलो नाही. कोणीतरी एकदा माझ्या मैत्रिणीच्या बहिणीला भेटलं,आणि ती काही वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये स्थायिक झाली आहे असंही समजलं. मग तर मी आता कसं आणि कधी भेटणार, हा विषयही डोक्यातून काढून टाकला.
तिचं लग्नानंतरचं नाव, आडनाव सुद्धा माहिती नाही तर फेसबुकवर तरी कसं शोधायचं ! कोणाच्या तरी मित्र यादीमुळे आपली भेट होणार नक्की असं वाटत राहिलं.हल्ली दिवसातला थोडा वेळ तरी फेस बुक पहाण्यासाठी  द्यावाच लागतो.तसंच एक दिवस दुपारी मी  पहात  बसले होते. तर एका फेसबुकवरच्या  मी टाकलेल्या फोटोला लाइक केलेलं एक नाव ओळखीचं पण फोटो पाहून नवं वाटलं. तिचा फोटो जेव्हा पुन्हा पहिला तर ती माझी मैत्रीण अलकाच आहे हे दिसलं.एकमेकीला मेसेज झाले, आणि दोघींना अतिशय आनंद झालल आहे हे आम्हाला लक्षात आलं. आम्ही दोघीही त्याच आनंदाच्या भरात ताबडतोब गप्पाच सुरु केल्या.टाइप करून करून एवढ्या वर्षांच्या गप्पा काही संपणार नव्हत्या.

गप्पा मारताना लक्षात आलं होतं की ती इंग्लंडमध्ये आणि मी भारतात. तो महिना होता ऑगस्ट. फार बरं वाटलं की ती नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच पुण्यात येणार म्हणाली. आम्ही भेटणार हे तेव्हाच ठरलं. मधल्या काळात हालहवाल समजत राहिली,व्होट्स् अप वर देवाणघेवाण सुरूच राहिली. आता दिसण्यात एवढा बदल झालेला असणार, पण आम्ही आणखी एका मैत्रिणीच्या घरीच भेटणार असं ठरवल्यामुळे काही प्रश्न नव्हता.भेटताच एवढ्या वर्षांचं अंतर संपून गेलं. आम्ही ३-४ तास नुसतं वेगवेगळ्या विषयांवर बोलत होतो. तेव्हाच असाही विषय झाला की आता एवढे वर्षं लोक संपर्कात नाहीत असं यापुढे होणार नाही. नव्या सोशल मिडीयामुळे लोक सहज भेटतील. 

गप्पांमध्ये ३२ वर्षांपूर्वीच्या आमच्या रहाण्याच्या ठिकाणापासून, एकमेकींच्या घरची मंडळी,त्यांची आवड-निवड,छंद, कोणाकोणाची कशी-कशी  वाटचाल आहे,    शिक्षण,व्यवसाय,स्पर्धा,देशात-परदेशांत वास्तव्य,नागरिकत्व,संस्कार,सिनेमे,गाणी,कायदे,किती आणि किती बोलणार ?तोपर्यंत अक्षरशः आमची जगभर सहल  झाली होती..  घड्याळ वेळ लक्षात आणून देत होतं.मग मात्र पुन्हा पुन्हा नक्की भेटत राहूया असं ठरवून,पटकन आपापल्या दिशेनी जायला निघालो. 

मी घरच्या वाटेनी निघाल्यावर, मला लक्षात आलं की, या भेटीची आठवण म्हणून आपण कोणीच एखादाही  फोटो का नाही काढला? आम्ही एवढ्या वर्षांनी भेटत होतो तर चाललं असतं ना एखादा फोटो काढून! पण गप्पा आणि गप्पातच एवढ्या रमलो होतो, की कोणालाच फोटो वगैरे काढावा अशी एकदाही आठवणच झाली नाही.. मग वाटलं आमची भेट किती छान,आठवणींना, हास्य विनोदांना जागा देणारी होती. ते सगळं काही आपण फोटोत बंद करू शकलो असतो, तर त्याचा खरं अनुभव घेता आला असतां का? फोटोसाठी मग विशेष प्रयत्न, आणि सहजता गेली असती निघून...

नंतर मात्र आपला एक एक फोटो पाठवा आठवण म्हणून असं मी कळवून टाकलं... दुधाची तहान ताकावर...एकत्र नाही फोटो तरी प्रत्येकीचा त्या दिवसाचा फोटो असूदे असं ठरवलं.

 

Friday, 4 July 2014

आमची अनोखी मुंबई सफर 

सध्या मुंबईला जायचं म्हटलं की एक्सप्रेस वे आणि गाडी ठरवूया अशीच चर्चा सुरु होते. आम्ही ठरवलं की, डेक्कन क्वीन च्या साधारण वर्गाचं तिकीट काढू आणि परतीचंही तेच तिकीट काढून पुण्यात रात्री परत येऊ. सुट्ट्या संपून शाळा सुरु होत आहेत.अजून पावसाळा सुरु झालेला नाहीये तोवरच मुंबईला जाऊन येणं असा बेत आपण आखू शकतो. एकदा का पाऊस सुरु झाला की विचारही करता येणार नाही.

डब्यात नेहेमी प्रमाणे नाश्ता न करता, आम्ही  Pantry मधे बसून, व्यवस्थित डिश मधे, नाश्ता करावा असं ठरवलं.गप्पा मारत,खंडाळ्याच्या घाटातून,तुरळक पावसाची सर आणि अंगावर तुषार घेत घेत, गरम गरम खाऊन मस्त कॉफी ही घेतली. दादरला आमच्या आवडत्या ठिकाणी जाऊन हवं ते घेउन,जेवून झालं.आता कुलाबा कॉजवे ला  पण बसनीच जायचं असं ठरवलं. बस मिळाली १ लीमिटेड. बसायला मस्त जागाही मिळाली. दोघींचं तिकीट फक्त रु.३६/-होतं.

आम्ही कुलाबा कॉजवेवर मनसोक्त भटकलो.भरपूर मजा आणि ठरवलेला टाईमपास करून  डेक्कन क्वीन साठी छत्रपती टर्मिनसला बसनीच  दोघींनी फक्त ८ रुपयात स्टेशन  गाठलं. आतापर्यंत असंख्य वेळा मुंबईला आलो,राहिलो पण अशी साधी साधी,मजा आपण आधी का घेतली नाही! निवांतपणे बस मधून जाता-येता एरवी गाडीनी दिसते त्यापेक्षा मला अधिक मुंबई पहाता आली. काही भाग समजले.खूप लोक भेटले.शाळेची मुलं भेटली.मी त्यांच्यातली एक सहप्रवासी आहे,हा आनंद घेत प्रवास करता आला. प्रत्येक उपनगराच्या ठिकाणचे वेगळे बाजार, वेगळी वस्ती पहात पहात आमचा बस प्रवास फारच मस्त झाला. 
साध्या डब्यातून प्रवास, त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीवर भरवसा ठेवूनही आपण मजा करू शकतो असं जाणवलं!
सध्या कोणत्याच व्यवस्थेवर आपला विश्वास राहिलेला नाही.या सफरीत हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत वाजवी दरात बसप्रवास करून मजाही करू शकतो हे अनुभवलं.आपल्या सवयीना बाजूला ठेवून थोडं वेगळं काही करून बघण्याचा आमचा सोस होता. तो अगदी सफल झाला.मुंबई सफरीतला आनंद म्हणूनच निराळा होता.
पुण्यातला महाग पडलेला रिक्षा प्रवास सोडला तर आमची मुंबई सफर अत्यंत कमी खर्चात झाली.सार्वजनिक वाहतूक उत्तम असणं, किती आवश्यक आहे जे जाणवत राहिलं.लिमिटेड,अनलिमिटेड, वातानुकुलीत, अशा निरनिराळ्या सुविधा देणारयाही बस आहेत हे माहिती असूनही फारसा अनुभवच घेतला नव्हता. याचं थोडं श्रेय अजूनही ब्रिटिशांच्या दूरदृष्टीला द्यावं लागतं.  
मुंबईला जावं,  मजा करावी असं वाटलं तर आता नक्कीच एक चांगला पर्याय मिळाला आहे याचा आनंद आम्हांला मिळाला आहे तो वेगळाच !