पालकांची शाळा
आपली मुलं- मुली ही आपली असतात. त्यांना कसं
वाढवायचं हे आपण पालक ठरवत असलो तरी, अनेक गोष्टींचा त्यांच्या वाढीवर नकळत परिणाम
होत असतो.पाळणाघर,घरातले सर्व मदतनीस,नातलग,भवताल,मित्र-मैत्रीणी,शिक्षक,शिक्षण,पुस्तकं,त्यांना
आपणच आणलेले काही खेळ,त्यांच्याशी मारलेल्या गप्पा,सिनेमा,मालिका,पाहिलेली ठिकाणं,
सगळ्याचा त्यांच्यावर-त्यांच्या मनावर काही नं काही ठसा उमटलेला असतो. एखाद्या
मुलावर जसा परिणाम झाला तसाच इतर मुलामुलींवरही होईल असं मात्र अजिबात नाही.त्याच
पालकांची मुलं,एकाच घरातली भावंडंही नाही का वेगवेगळी असतात!
माझ्या कामा दरम्यान पालकांशी झालेल्या अनेक
चर्चांची आठवण होते. शाळा बदलली आणि वेदांत बदलला असं संगीता
म्हणत होती.वारंवार दाखले देत होती.त्याच्या शाळेच्या वेळा पाहून तिनी कामाच्या
वेळा ठरवल्या होत्या. त्याच्याशी सहजपणे बोलता यावं,त्याच्या मनांत काय चाललंय ते
सहज समजावं असा हेतू ठेवून तिचे प्रयत्न सुरु होते.मोठया शाळेत जायला लागलाय तसा
अनेक गोष्टी नव्यानी पहायला लागलाय,ऐकायला लागलाय आणि त्यामुळे त्याचं वागणं
बदलतंय हे तिच्या लक्षात येत होतं. मुलांसमोर नवनव्या गोष्टी जाणीवपूर्वकच समोर
येतील असा प्रयत्न पालकांना करावा लागतो. पण मुलांनी नवीन काय पाहिलं असावं
याची कल्पना तर नक्कीच येते,ना! ते भान असणारे पालक समजून-उमजून मुलांशी बोलत
राहिले तर होणारा परिणाम निश्चितपणे वेगळा असतो. मुलांना काय आणि कधी, समोर
ठेवायचं याचा डोळस विचार करणारे पालक मला क्वचितच भेटतात.एक अभ्यासक म्हणून मी
पालकांचाही अभ्यास करत असते. बारकाईनी निरीक्षण करते. तेव्हां दरवेळी लक्षात येतं हे,
की पालकांनी पालक होण्यासाठी काहीही प्रशिक्षण घेतलेलं नसतं, नव्हे त्याची
काही गरज नाही असंही बोलताना मी ऐकलय.
एका नावाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या
शाळेनी, त्यांच्या विद्यार्थ्यांनी, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत जाऊन मुलां-मुलींना
काही सांघिक खेळ, गाणी शिकवायची असा उपक्रम ठरवला. पालक सभेमध्ये मग त्यावर बरीच
चर्चा, वाद-विवाद, काही पालकांनी नाराजीही दाखवून झाली. पण शाळेचा निर्णय होता,
त्याला विरोध नं करता घरीही काय बोललं जावं, विचारलं जावं-तेच सांगण्यासाठी
पालकसभा बोलावली होती.नंतर मुलांशी सविस्तर बोललं जाणार, ऐकूनही घेतलं जाणार असाच हेतूपूर्वक
आखलेला उपक्रम होता. मुलांना खूप काही शिकायला मिळाल्याचं सर्व शिक्षकांनी आणि
काही पालकांनीही सांगितलं.
एक पालकांचा गट तर कायमच त्या शाळेत जात
रहायचं,म्हणजे आपणही मुलांसारखं एक वेगळं नं पाहिलेलं
जग बघू असं ठरवून शाळेकडे आला आणि एक वेगळाच उपक्रम त्यातून सुरु झाला. अर्थातच
त्या घरांमधे मुलांनाही नवनवीन गोष्टी समोर येत राहिल्या,नकळत वेगळं समजत
गेलं,प्रश्न पडत गेले,आणि शिकण्याला पुस्तकच नाही तर भवतालची परिस्थिती डोळसपणे
बघण्याची एक समज आली.
वर्गांत असणारी मोजकी अपंग मुलं, सर्व
वर्गाला असंच सहजपणे शिकवत असतात, पण त्यावर पालकांशी मोकळा संवाद झाला तरच ते
घरात समजतं. अशा विशेष क्षमता असलेल्या मुलांशी कसं वागायचं, सहानुभूतीची त्यांना
गरज नसते तर त्यांना समजून घ्यावं एवढंच!
घरात पालकांकडून मुलांशी बोलणं म्हणजे जर होमवर्क,ट्युशन्स,प्रोजेक्ट्स,परीक्षा,ट्रीप
एवढंच असेल तर झालंच. मग मुलं शाळेत इतर बरंच शिकत असतात, ते कसं शिकतायत
हे कसं समजणार?
अगदी टीपकागदा सारखं मुलं पट्कन टिपत
असतात. खूप अनुकरण करत असतात. एकदा माझी मुलगी शाळेतून आल्यावर पाय
धुणार पण हाताचा वास जातो, हात धुणार नाही म्हणाली. चमच्यानीच खाता येईल असं दे हे
ही वर सांगून झालं. बोलता बोलता गप्पातून समजलं की रिक्षातल्या मोठया मुलांचं
पाहून सगळीच मुलं पेट्रोल पंपावर रिक्षा थांबली की पेट्रोलचा थेंब हातावर घेतात. तो
वास छान असतो असं ती म्हणतात. तो वास जाऊ नये म्हणून हात धुवायचा नाही असं त्यांनी
सांगितलं होतं. पेट्रोलमध्ये असं काय असतं की त्याचा वास येतो, तसा कशाकशाला वास
येतो, कोणकोणते वास कोणाला आवडतात,वास तयारही करता येतात,वास घेण्याचं कसं एक
मोठ्ठ कामही अनेक लोक करतात,कुत्रे वास घेतात आणि चोरही शोधतात वगैरे खूप गप्पा होऊन विषय बराच रंगला. पेट्रोलचा वास आणून
हात नं धुणं कधीच थांबलं आणि उलट त्यावर विनोद सांगणं सुरु झालं. थेट नकारही नं
देता,नं रागावता एक प्रश्न सहज सोडवला होता आणि वर बरीच माहितीही करून देता आली.
एकदा शेजारची मुलं खेळताखेळता दिवाळीच्या
सुट्टीत कुठे जाणार,यावर त्यांची बडबड सुरु होती. एक मुलगी बाबांबरोबर बोटीवर
जायचंय-खूप मजा येईल,कुठे जाणार ते मात्र नाही माहिती म्हणत होती. तिची मैत्रीण
मात्र उटीला,त्या अमुक तमुक गाण्याचं शुटींग नाही का झालं, तिथे जाणार असं सांगत
होती. अशावेळी आमच्या बाई नकाशा घेउन बसायला लावायच्या. कोणीही कुठे जाणार असलं तरी
अख्ख्या वर्गाला कशी माहिती आपोआपच व्हायची,तिथे काय पहायचं तेही सांगायच्या त्याची
आठवण झाली.
मराठी माध्यमाच्या शाळेत मुद्दाम प्रवेश
घेतलेला माझा भाचा एकदा सांगत होता. सरांनी वर्गात
विचारलं,की कोणाकोणाचे बाबा-आई, मावशी,मामा,सिग्नल लाल असतांनाच निघतात,की हिरवा
झाल्यावर ते सांगा. मुलंच ती खरंखरं बोलली.तेवढ्या मुलांच्या घरी चिठ्ठीवर
लिहिलेला निरोप गेला की नियम मोडण्यासाठी नसतात. व्यवस्था ही सर्व सुरळीत चालावं,अपघात
होऊ नये यासाठी असते. ते वर्गात मुलांना म्हणायचे की माणुसकीचे धडे-नागरिकशास्त्र,
हे काही बसवूनच शिकवलं पाहिजे असं नाही. मोठया माणसांकडे नीट पहा,त्यांच्याही कडे
पाहून खूप शिकता येतं. म्हणजे पालकांचं वागणं कसं असायला पाहिजे आणि कसं असतं !
संगीता म्हणत होती की मोठया शाळेत सोमवारी
खूप मुलांच्या डब्यात पिझ्झा-बर्गर असलंच असतं,शाळेच्या बसमध्ये मॉलला जाऊन
आल्याच्या गप्पा असतात, तेव्हापासून वेदांग आपण का जात नाही,लोक जातात वगैरे बोलायला
लागलाय. तुलना सुरु असते सारखी. एकदा तर त्या मॉलच्या आत मुलांना गेम्स खेळता
येतात हे ऐकून तो आजच जायचं नाहीतर मी जेवणार नाही बोलायला लागला. संगीता जे सांगत
होती,तिच्यासारखंच बाकीच्याही सांगायला लागल्या. नाही ऐकायची सवयच राहिली नाहीये
हल्ली मुलांना. पण ती लावत नाही आपणच ना ! आपण लागतील त्या गोष्टी लागतील तेव्हां नक्की
घेऊया. पण मॉल बघायला जायला काहीच हरकत नाही, हे सांगितलं तर काहीच हरकत नाही.
मुलांनो
मार्क मिळवताना जी मुलं जास्त मार्क मिळवतात त्यांच्याकडे बघा,पण चैन करतांना -मजा
करतांना ज्यांना एवढीही मजा करता येत नाही त्यांची आठवण ठेवा असं सांगण्याची एक
पद्धत होती. ती गेली की काय,फक्त तुला जे जे हवं ते मिळव आणि कसंही करून मिळव असं
रुजतंय की काय!
आपल्याला वाढवताना या महिन्यात आता जरा
खर्च बेतात कारण दिवाळी येतीय...पाहुणे येणार आहेत,सुट्टीला जायचं ना
आजी-आजोबांकडे असे संवाद घराघरांतून होत असत. त्यांत कमीपणाची भावना नसायची. मीनल
आठवून सांगत होती,दादाला या महिन्यात सायकल घेतलीय,तर तुम्हाला दोघींना काहीतरी
खेळ घेऊया, काय घ्यायचा ते तुम्ही ठरवून ठेवा हे ऐकल्यावर जे काय वाटलं होतं ना ! असूया,स्पर्धा,चढाओढ
या नैसर्गिक भावना आहेत आणि राहणारच. पण पालक त्यावर त्या त्या वेळी समजून
मार्ग काढतात.फक्त मुलांना असुरक्षित वाटायच्या आत त्यावर मुलांशी बोललं गेलं
पाहिजे-ते ही जाणीवपूर्वक.
आम्ही खेळताना काय काय बोलतो याच्याकडे
लक्ष द्यायची जवाबदारी आम्हांला सांभाळायला येणारी बेटी मावशी हिच्यावर होती. आम्हांला
ते खूप दिवसांनी समजलं. कारण एकदा अर्जुन आणि प्रणिता बोलतांना आपण घरातून
गुपचूप पैसे आणांयचे मग पेप्सीकोला खायचं असे बोलले होते. मला वाटलं आता ते पैसे
आणतील आणि खातील पेप्सीकोला ! पण दोन दिवस काही त्यांनी घेतला नाही,मग मी विचारलं
तर त्यांनी ठरवलेलं त्यांच्या आईला समजलं होतं आणि आईनीच एकदम विचारलं की
पेप्सीकोला कोणाकोणाला आवडतो,आणणार आहे ती घरी येतांना त्यामुळे पैसे घ्यावेच
लागले नाहीत.
हल्ली हल्ली एक नवीनच खूळ शाळेच्या बसमुळे
ऐकू येतंय. कोणाकोणाची आई त्यांना मोबाईल देते,शाळेत चालत नाही तर गुपचूप
दप्तरातून आणतात,आणि बसमधे त्याच्यावर खेळतात. एका मुलीनी तर खूप भारी फोन
आणला,त्यांत उघडी मुलं-मुली ती पहात आणि दाखवत होती.मग बसमधून उतरल्यावर रमतगमत
घरी जायचं-सुरु झालं. आईला रजा काढून घरी थांबल्यावर ते लक्षात आलं. तेव्हापासून
मोबाईल देणंही बंद झालं.तीचा एकटीचाच मोबाईल नाही तर शाळेत येतांनाच दप्तरं तपासूनच
आत घ्यायला सुरुवात झाली. मोबाईल आणला असेल तर तो प्रिन्सिपॉल कडे ठेवून मग
पालकांना बोलावून त्यांनाच देणं सुरु झालं.ही शिस्त शाळेनी ठरवलेली होती आणि
त्याला शासनही होतं. तरीही वर्गांत लहान वयात मोबाईल वापरण्याचे परिणाम समजेल अशा
भाषेत सांगितले गेले होते.
मुलं काय विचार करतात आणि कसा विचार
करतात,हा खरोखरीच अभ्यासाचा विषय आहे. गौरी अचानक म्हणायला लागली की मी तुमची
नावडती आहे ना,म्हणूनच तुम्ही माझे लाड करत नाही.हा विषय कसा आला मनांत,यावर मग
घरात विचार सुरु झाला. काकूंनी सांगितलेली आवडती-नावडतीची गोष्ट असेल की काही
कानावर आलेलं अर्धवट ऐकलेलं असेल. पण त्यावर मधूनच विचारत रहाण्या ऐवजी आईनी सरळ गौरीला सांगितलं ते फार बरं
झालं.आम्हांला एक बाळ आवडलं म्हणून तर आणलं दवाखान्यातून,आणि गौरी नाव तर आमचं
खुपच आवडीचं,मग नावडती कोण गं असणार? असुरक्षित का वाटत असेल तिला? कदाचित हट्ट
केला, रागावून घेतलं की मग लहान मुलं सुद्धा अशी काही अस्त्र वापरतात.
त्यांच्याकडे लक्ष वेधून घेतात. त्याकडे दुर्लक्ष नं करता ते अस्त्र वापरणं हा स्वभाव
तर बनत नाही ना हे मात्र सावधपणे पहायला लागतं.
सावी
सतत बाहुल्या घेउन खेळायची.त्यांच्याशी बोलायची. बाहुली आजारी आहे,झोपली आहे,तिला
कपडे आणायचे,अगदी डायपर्स सुद्धा..आणायचेच, हे ठरून गेलेलं होतं. आसपासच्या तिच्या
वयाच्या मुलात मात्र अजिबातच खेळायला जायचं नाही. आठ वर्षाच्या सावीचा हा हट्ट बंद
व्हावा यासाठी घरात काही ना काही प्रयत्न सुरु होते. पण ही समस्या आहे,दोन्ही
पालकांनी एकत्र निर्णय घेउन थोडा कठोर निर्णय घेतला पाहिजे,हे सांगेपर्यंत खेळणं
बंद होत नव्हतं. ते सुरूच राहिलं तर ती खोट्या आभासी दुनियेत रमत राहील हे काही
बरोबर नाही हे सांगितल्यावर मात्र सावी सोबत वेळ घालवण्याचे अनेक मार्ग पालकांनी शोधले.परीराणी,जादूगार,कॉमिक्स,स्वप्नमय
जग याची गंमत आहेच पण त्याला मर्यादा आहेत.
कुटुंब
न्यायालयात पालक त्यांच्याच मुलांना भेटायला येतात आणि तिथे पालक होणं म्हणजे काय
तेच नं कळून फक्त मुलांना खेळ,भेटवस्तू,चोकलेट-बिस्किटं देत बसतात. मुलांना यांतून
काही वेगळं वळण लागेल हा विचारही ते करत नाहीत. किती साधं,सहज देता येणारी गोष्ट
खरं तर मुलांना दिली तरीही आवडते. विशिष्ट वयाच्या मुलांच्या पालकांकडून काय
अपेक्षा असतील हा विचार जरी पालक करत असते तर एवढे समस्याग्रस्त पालक आणि मुलंही
बघायला मिळाली नसती.
पालक बाहेर जातात,पैसे मिळवतात,घरातल्या सगळ्यांसाठी,अडीअडचणीसाठी
ते ठेवायला लागतात. चैन आपल्याला रोज करता येणार नाही हे सांगून मुलांची समज
वाढेलच. मग त्यांना ‘नाही’ म्हणायला पालक घाबरतात की काय? आपलं बाहेर
रहाणं,मुलांना कमी वेळ देणं याची भरपाई म्हणून वाट्टेल ते हट्ट पुरवतात असं एक
निरीक्षण आहे. सुगंधा तर म्हणते, आमच्या लहानपणी जे आम्हांला मिळालं नाही ते आम्ही
मुलांना सगळं देणार असं ठरवलंय! अहो देणार देणार जे म्हणताय नां ते
प्रेम,विश्वास,सोबत,संस्कार,गप्पा,आवश्यक तेव्हाच मदत,या ही गोष्टी मुलांना द्यायच्या
असतात. व्यवहारी जगाची ओळखही करून द्यायची असते. सजग असं नागरिक म्हणून त्यांना
आपण तयार करायचं असतं. ते त्यांना आयुष्यभर उपयोगी होईल. मोबाईल,गेम्स हे वेळ
घालवायला,आणि काहीच करायचं नाही,करता येत
नाही त्यांना सोबत करतील पण मुलांना मात्र आजारच देतील.
रोजच्या
वर्तमानपत्रात पळून गेलेली मुलं,त्यांच्या आत्महत्या,वाढती गुन्हेगारी, एकलकोंडेपणा,नैराश्य
अशा असंख्य बातम्यां आपण वाचतोय. मग मुलांना दोष देऊन आपण सुटका करून घ्यायची?
अजिबातच नाही. पालक म्हणून आपणच चुकतोय का हे तपासून पहायला हवं. बदलही
करायला-पुरेसा विचार करायला पाहिजे,तज्ञाची मदत घ्यायला पाहिजे. हे आपणच करायचं कारण
मुलं आपलीच आहेत.