संथ आणि निवांत
सध्या पुण्यात मस्त थंडी पडली आहे. त्यामुळे शेकोटी पाशी बसावं असं खरं तर सगळ्यांना वाटतं. आम्हीही हा विचार करायचो आणि एकदा चक्क पेटवली शेकोटी. नंतर चूल पेटवून त्यावर अंघोळीसाठी पाणी तापवावं असंही बोलणं होऊन आम्ही पाणी तापवायचो. मजा यायची. गरम गरम पाणी बादलीत घेउन तांब्यानी ते अंगावर घेत रहाण्याची मजा अनुभवणं ! मनातल्या मनात तुलना करत रहाणं की शावरचं(Shower) पाणी कसं आणि किती वापरलं जातं, ते कसं लवकर निवून जातं.त्याचं काही मोजमापच नसतं. पण मनात आलं की लगेच अंघोळ करता येण्याची सवलत !
आम्ही एखाद्या वर्षी चूल तयार करतो आणि एखाद्या वर्षी मात्र नुसत्याच गप्पा आणि आठवणी. अंगणात बागेतल्या झाडांच्या फांद्या, नारळाच्या वाळलेल्या झावळ्यांच्या अनेक तुकड्यांचा ढिगारा,नारळाच्या करवंट्या, चिकू,चाफा,गुलमोहर याच्या वाळक्या फांद्या अशी सगळी लाकडं नेहमी साठतात. आमचे माळी कदम काका- घरच्या बंबात जळण म्हणून घेउन जातात. हे वर्षानुवर्ष सुरु आहे.
आम्ही एखाद्या वर्षी चूल तयार करतो आणि एखाद्या वर्षी मात्र नुसत्याच गप्पा आणि आठवणी. अंगणात बागेतल्या झाडांच्या फांद्या, नारळाच्या वाळलेल्या झावळ्यांच्या अनेक तुकड्यांचा ढिगारा,नारळाच्या करवंट्या, चिकू,चाफा,गुलमोहर याच्या वाळक्या फांद्या अशी सगळी लाकडं नेहमी साठतात. आमचे माळी कदम काका- घरच्या बंबात जळण म्हणून घेउन जातात. हे वर्षानुवर्ष सुरु आहे.

या वर्षी मात्र नुसतंच बोलणं न रहाता आम्ही चूल पेटवतो आहे.माळ्यावर जळमटानी झाकलेलं पाण्याचं भांडं,तापलेलं पाणी काढण्याचं दांडीचं भांडं एक दिवस खाली आलं.त्याला माती लावून झाली.मग रॉकेल आणून ठेवलं अशी आमची तयारी पूर्ण झाली. लाकडं जमा करून ठेवली. आता भांड्यात पाणी भरून ठेवणं,हे मात्र आलटूनपालटून करत रोज घरच्या सगळ्यांच्या अंघोळीसाठी लागणारं पाणी घरच्याच सरपणा वर तापवतो आहे. शेकोटीची ऊब मिळते आहे. तेव्हाच डोळ्यात धूर जातो आहे.पण रोज अगदी रोज अशा अंघोळीची मजा घेतो आहे.
अमुक तमुक फार्महाउसवर... खेड्यातल्या सारख्या वातावरणात राहण्याची चुलीवरच्या भाकरीची मजा घेण्यासाठी लोक जातात. आम्ही घरातच ती मजा घेतो आहे.पेपर वाचन,गप्पा,चहा देखील चुलीपाशी! आमच्या अंघोळीसाठी पाणी तापत असतांना नुसते निखारे काढून त्यावर वांगी भाजून मस्त भरीतही करून झालं. ही सर्व मजा काही दिवसांत संपेल. कारण रोज असं संथ-निवांतपणे, आवरत नेहमीचं वेळापत्रक गाठता येणार नाही.
पूर्वी आपल्या आजी-पणजी, आजोबांनी असं नेहमीच पाणी तापवलं होतं. पाणीच काय सगळा स्वयंपाक घरोघरी चुलीवरच होत होता. जगण्याला निराळा वेग होता. गरजा वेगळ्या होत्या,धावपळ,दगदग करून बस गाठून कामाला जाणांरे नव्हते. एक शांतपणा होता.
आता हा संथपणा हरवला आहे.आपला पेशन्स, वाट पहात रहाणं, दम खात बसणं, धीर धरणं आपण विसरत चाललो आहोत असं वाटतं. बटण दाबलं की बसल्या जागेवरून न उठताही पडदे सरकवणे असे काहीसे जादुई...झट की पट...! पण चूल पेटेल, हळुहळू पाणी तापेल,मगच अंघोळ करता येईल..म्हणून थांबायला,वाट ही पहायला हवी. सध्या रोज चुलीवर पाणी तापवत, मी हा संथपणा -निवांतपणा अनुभवते आहे, नव्यानी शिकते आहे.