आम्ही मैत्रीणी
आमच्या ठिकठिकाणी बदल्या,शिक्षण आणि वास्तव्य यामध्ये अनेक मित्र-मैत्रिणींशी संपर्कात रहाताच आलं नाही याची नेहमी खंत असें. बदली झाली की सगळं नव्या ठिकाणी नव्या उत्साहात सुरु करण्याचीही मजा असें.अशाच एका मैत्रिणीला कसं भेटता येईल असा विचार मनात येऊनही गेला आणि मागे पडला होता.
खरं तर मी शाळेत आणि ती कॉलेजमध्ये,वयात अंतर,पण फिरायला जाणं, घरच्या काही कामांसाठीही एकत्र बाहेर जाणं, गच्चीवर चांदण्यात एकत्र जेवणं, कोजागिरी, सुट्टीत पत्ते, अशा अनेक कारणांनी सारखंच भेटायचो. अगदी २-३ वर्षं आम्ही क्वार्टर्स मधे खाली-वर राहणारे नंतर मात्र ३०-३२ वर्षात एकदाही भेटलो नाही. कोणीतरी एकदा माझ्या मैत्रिणीच्या बहिणीला भेटलं,आणि ती काही वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये स्थायिक झाली आहे असंही समजलं. मग तर मी आता कसं आणि कधी भेटणार, हा विषयही डोक्यातून काढून टाकला.
तिचं लग्नानंतरचं नाव, आडनाव सुद्धा माहिती नाही तर फेसबुकवर तरी कसं शोधायचं ! कोणाच्या तरी मित्र यादीमुळे आपली भेट होणार नक्की असं वाटत राहिलं.हल्ली दिवसातला थोडा वेळ तरी फेस बुक पहाण्यासाठी द्यावाच लागतो.तसंच एक दिवस दुपारी मी पहात बसले होते. तर एका फेसबुकवरच्या मी टाकलेल्या फोटोला लाइक केलेलं एक नाव ओळखीचं पण फोटो पाहून नवं वाटलं. तिचा फोटो जेव्हा पुन्हा पहिला तर ती माझी मैत्रीण अलकाच आहे हे दिसलं.एकमेकीला मेसेज झाले, आणि दोघींना अतिशय आनंद झालल आहे हे आम्हाला लक्षात आलं. आम्ही दोघीही त्याच आनंदाच्या भरात ताबडतोब गप्पाच सुरु केल्या.टाइप करून करून एवढ्या वर्षांच्या गप्पा काही संपणार नव्हत्या.
गप्पा मारताना लक्षात आलं होतं की ती इंग्लंडमध्ये आणि मी भारतात. तो महिना होता ऑगस्ट. फार बरं वाटलं की ती नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच पुण्यात येणार म्हणाली. आम्ही भेटणार हे तेव्हाच ठरलं. मधल्या काळात हालहवाल समजत राहिली,व्होट्स् अप वर देवाणघेवाण सुरूच राहिली. आता दिसण्यात एवढा बदल झालेला असणार, पण आम्ही आणखी एका मैत्रिणीच्या घरीच भेटणार असं ठरवल्यामुळे काही प्रश्न नव्हता.भेटताच एवढ्या वर्षांचं अंतर संपून गेलं. आम्ही ३-४ तास नुसतं वेगवेगळ्या विषयांवर बोलत होतो. तेव्हाच असाही विषय झाला की आता एवढे वर्षं लोक संपर्कात नाहीत असं यापुढे होणार नाही. नव्या सोशल मिडीयामुळे लोक सहज भेटतील.
गप्पांमध्ये ३२ वर्षांपूर्वीच्या आमच्या रहाण्याच्या ठिकाणापासून, एकमेकींच्या घरची मंडळी,त्यांची आवड-निवड,छंद, कोणाकोणाची कशी-कशी वाटचाल आहे, शिक्षण,व्यवसाय,स्पर्धा,देशात-परदेशांत वास्तव्य,नागरिकत्व,संस्कार,सिनेमे,गाणी,कायदे,किती आणि किती बोलणार ?तोपर्यंत अक्षरशः आमची जगभर सहल झाली होती.. घड्याळ वेळ लक्षात आणून देत होतं.मग मात्र पुन्हा पुन्हा नक्की भेटत राहूया असं ठरवून,पटकन आपापल्या दिशेनी जायला निघालो.
मी घरच्या वाटेनी निघाल्यावर, मला लक्षात आलं की, या भेटीची आठवण म्हणून आपण कोणीच एखादाही फोटो का नाही काढला? आम्ही एवढ्या वर्षांनी भेटत होतो तर चाललं असतं ना एखादा फोटो काढून! पण गप्पा आणि गप्पातच एवढ्या रमलो होतो, की कोणालाच फोटो वगैरे काढावा अशी एकदाही आठवणच झाली नाही.. मग वाटलं आमची भेट किती छान,आठवणींना, हास्य विनोदांना जागा देणारी होती. ते सगळं काही आपण फोटोत बंद करू शकलो असतो, तर त्याचा खरं अनुभव घेता आला असतां का? फोटोसाठी मग विशेष प्रयत्न, आणि सहजता गेली असती निघून...
नंतर मात्र आपला एक एक फोटो पाठवा आठवण म्हणून असं मी कळवून टाकलं... दुधाची तहान ताकावर...एकत्र नाही फोटो तरी प्रत्येकीचा त्या दिवसाचा फोटो असूदे असं ठरवलं.