Monday, 18 February 2013

आपलं घर !

 थोडा बदल  हवा असं वाटतं, तेव्हा माणसं आपल्या गावापासून लांब, आपल्या घरापासून दूर जातात. हॉटेल मधली खोली स्वच्छ-हवेशीर पण गजबजाटापासून लांब असावी असंही पहातात.खाण्यापिण्यात ही बदल म्हणून वेगळं,घरी नेहमी नं होणारं काही तरी मागवतात.बरोबर घेतलेल्या वस्तू,खाऊ नेहेमीच जरा जास्त झालेला  असतो. आग्रह करकरून सगळ्यांना तो देण्यातही मजा येत असते.

सगळेच जण रोजच्या पेक्षा वेगळे कपडे बरोबर नेतात,भरपूर फिरतात, गप्पा-गाणी ,चेष्टा-मस्करी चालते.पुढच्या सहलीचे बेत आखण्याची अगदी चढाओढच लागते. नवनवे बेत आखले जातात.पैजा लागतात.  बदल  ताजतवानं करत असला तरी  आपल्या घरी कधी जायचं, त्याचं मनातल्या मनात नियोजन सुरु असतं.२-३ दिवस बदल झाला की  आपल्या घरची आठवण यायला लागते.  ठिकठिकाणी काढलेले फोटो,घेतलेला खाऊ,कोणाकोणाच्या नावानी आणलेल्या वस्तूंची बांधाबांध करून त्या कधी,कोण कोणाला देणार ते ठरवलं जातं. अच्छा-पुन्हा भेटू वगैरेही होतं.निरनिराळ्या प्रसंगांची उजळणी करत--काय धमाल केली ते एकमेकांना सांगत-- घरी गेल्यावर काय कामं करायची ते आठवत असतानाच घर येतं.बाहेरगावी जाताना प्रवासाचा शीण जाणवत नाही पण परत येताना मात्र सगळ्या बदला नंतरचा शीण जाणवायला लागतो.

नव्या आणलेल्या वस्तू बाजूला  काढून ठेवल्या जातात. नेलेलं सामान जागच्या जागी लावून ठेवलं जातं.
बंद घर असूनही कित्ती-कित्ती घाण झालेलं असतं.ती साफ-सफाई केली जाते.आपल्या नोकरीची ,मुलांच्या शाळेची तयारी करायची असते,मुलंही स्वस्थ बसू देत नाहीत.त्यांचा गृहपाठ,शाळेचे कपडे-बूट,डब्याची तयारी यात घरी आलो तो दिवस कसा संपला ते कळत नाही.रात्री अंथरुणाला पाठ टेकताना दोन दिवस घेतलेल्या आयत्या चविष्ट जेवणाची-मनमुराद केलेल्या भटकंतीची आठवण पुन्हा येते.

आपल्या घरात निवांत झोप होते तेव्हा मात्र वाटतं खरंच, आपल्याला थोडासाही बदल किती ताजंतवानं करून टाकतो. केवढं वेगळं जग त्यामुळे आपण बघतो. कितीतरी नव्या ओळखी ही होतात. मुलान तर केवढी मजा येते. पण  तरीही मनात येतं---घर ते घरंच! आपलं,आपण मांडलेलं- कधी पसरलेलं आणि कंटाळून आवरलेलंही  पण आपलं असलेलं घर !!!!!!!