वाचाल तर .....
मी जे काम स्वयंसेवक म्हणून करते त्याबद्दल सांगायला मला एका साठी गाठलेल्या मैत्रिणींच्या गटात बोलावलं होतं. माझे अनुभव सांगायला मला मजा आली.माझ्या बोलण्यानंतर त्यांनी प्रश्न विचारले आणि मग छान संवाद सुरु झाला. सगळ्याजणी वाचून त्यावर नियमितपणे बोलणाऱ्या होत्या.त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आनंद खूप वेगळा होता. मला अगदी आवडणारा! पुस्तक भिशी च्या निमित्ताने त्या भेटतात त्याला १६-१७ वर्षं झाली आहेत. प्रत्येक जण दरवर्षी १२ पुस्तकं वाचते त्यावर बोलते, आणि पुस्तक निवडून ते संग्रही ठेवते. प्रत्येकजण यामुळे वाचनप्रेमी आहे आणि पुस्तकांचा त्यांचा संग्रहही झाला आहे.सगळ्याजणी उत्साही- वाचना बरोबरच प्रत्येकजण काही नं काही स्वतः शिवते, विणते, भरतकाम करते,कोणी ओरीगामी करते आणि काही जणींना शिकवते सुद्धा ! गंमत इथे संपत नाही बरं का!
मी घरी आल्यावर घरातल्या सगळ्यांना, मित्र मंडळींना या वाचनप्रेमी मैत्रिणींकडून घेतलेल्याच उत्साहात सगळं सांगत होते. ऐकून आमच्या मित्रांनी त्यांच्या आणखी काही मित्रमंडळीत ते सांगितलं. यातल्या एकानी चक्क वर्तमानपत्रातल्या सदरात त्याबद्दल लिहिलं. मग त्याला फोनवर एका प्रसिध्द दुकानदारानी या मैत्रिणीं विषयी विचारून त्यांना कसं गाठता येईल ते विचारलं. कोणाला त्यांचे फोन नंबर माहिती असणार मग फिरत माहिती काढत माझ्या पर्यंत विचारणा आली. मी लगेच फोन नंबर दिला. मला फार बरं वाटलं की कोणी तरी एका चांगल्या उपक्रमाची दखल घेतलेली दिसते आहे. पण ते तिथेच थांबलं नाही बरं का!
एक-दोन दिवसांनी त्या वाचनप्रेमी मैत्रिणीचा वर्तमानपत्रात फोटो आणि ते ही एका प्रसिध्द व्यंगचित्रकाराच्या हस्ते भरपूर पुस्तकांचा संच भेट म्हणून स्वीकारताना! मला गंमत वाटली ती गोष्ट कशी पुढे गेली त्याची .... गप्पा सहज मारत असतांना त्यातलं योग्य ते आमच्या एका मित्रांनी उचललं... ते पुस्तकाच्या दुकानदाराला म्हणण्यापेक्षा पुस्तक प्रेमीला कळलं आणि त्यांनी छोटासा कार्यक्रम घडवून त्याला योग्य ती प्रसिद्धी दिली.
या घटनेची सविस्तर हकीगत त्या गटा मधल्या एका मैत्रिणीचा फोन आल्यावर तिच्याकडून ऐकली. मला चांगलं वाटलेलं मी लोकांना सांगितलं पण लोकांनी ते पुढे नेलंय यातच त्याचं मोठेपण अधिक आहे असं मला वाटतं !
प्रसिद्धीसाठी करत नसलेल्या गोष्टीला आपोआप दूरवर पोहचता आल्याचा अधिक आनंद आहे.
No comments:
Post a Comment