Friday, 10 May 2013

  अनिल-माधुरीचे आणि माझेही बाबाच !

 आमच्या आई गेल्या  १९८७ मध्ये -त्याला २६ वर्षं उलटून गेली.  २६मे २०१३ ला  बाबा सुद्धा हे जग सोडून,आमच्यातून गेले! अगदी सांगून, आमच्या मनाची हळूहळू तयारी करून घेत पट्कन, त्यांना हवं होतं तसं..एका झटक्यात निघून गेले... आज १५ दिवस झाले तरी कालच झालेल्या गोष्टी सारखं सगळं स्पष्ट-स्वच्छ  दिसतंय..आठवतंय. दु:खं करून ते काही परत येणार नाहीत...चित्र पुन्हा जुळणार नाही ..पण आमचे बाबा -त्यांच्या शिस्त-काटेकोरपणा-बारकावा,नातेसंबंध जपणे,नियोजनबद्ध जगणे अशा अनेक गुणांनी  आमच्यात आहेत -ते तसेच राहणार आहेत !

प्राध्यापक, कवी,मितभाषी, मार्मिक विश्लेषण करणारे,सतत स्वतःचे आणि इतरांचे स्वातंत्र्य जपणारे, सर्वांशी संवाद साधताना त्यांचे त्यांचे दैनंदिन व्यवहार,त्यांचे वेळापत्रक कधीही नं बिघडू देणारे, काहीसे एकटे तरीही स्वतःला गुंतवून ठेवणारे ...घड्याळाच्या काट्यांवर त्यांची दिनचर्या बेतलेली, तरीही समंजसपणे तडजोडीला तयार असलेले एक  सौम्य,शांत व्यक्तिमत्व.
वामन आजोबा अभ्यास करतात असं प्रज्ञा-मेधा लहान असतांना म्हणायच्या. व्यवस्थित  आवरलेल्या टेबलपाशी ताठ बसून लेखन करण्याची  त्यांची  सवय मुलीना अभ्यास वाटत असे. वहीत, डायरीत  बारीक-सारीक नोंदी ते ठेवत. स्वतः ची तब्बेत,एखादी विशेष घटना, राजकीय विचार, आवडलेला किंवा उत्तम लेख, भारतभर केलेल्या सहलीं अशा  भरपूर नोंदी ठेवण्याची त्यांची सवय.  कधी  कधी  प्रवास वर्णना बरोबर एखादी कविताही लिहायचे.
घरात सर्वांमध्ये असले तरीही अलिप्तपणे सगळ्या घटनांकडे  ते बघत असतात, निरीक्षण करतात असे जाणवत असे.
ते सांगत की मला परावलंबी जगणं,अजिबात आवडत नाही. आज एक तर उद्या काहीतरी वेगळं, अशी माझी कुरबुर काही थांबतच नाहीये. फार थकवा जाणवतो.मन कशातच  रमत नाही .त्यांनी सरळ एक दिवस पुन्हा आम्हाला समोर बसवून सांगितलं की "हे जगणं काही खरं नाही, मला कंटाळा आला आहे.प्रत्येक गोष्टीत मला दुसऱ्याची मदत घ्यावी लागते आहे, हे काही बरोबर नाही".
 आता ते नाहीत हे सत्य असलं तरी त्यांच्या विचारपूर्वक केलेल्या अनेक गोष्टीतून, कामातून ते आमच्यापाशी नेहमीच राहणार आहेत.

No comments:

Post a Comment