Wednesday, 30 November 2016


               आशाताई एक निराळं व्यक्तिमत्व

एक वर्ष होऊन गेलं,मला इथे लिहून !मला लिहायला आवडतंय हे कळून इतकी वर्ष झाली पण का कोण जाणे, नियमितपणा प्रत्येक बाबतीत असायला हरकत नाही हे कळत असून वळत मात्र नाही. आज मात्र राहावेना !त्याला कारणही तसंच झालंय !
आमच्या मंडळातल्या एक उत्साही आजी आता आम्हांला पुन्हा भेटणार नाहीत.
              काल दुपारी मला फोन आला आणि आशाताई चक्रदेव (आजी) गेल्याचं समजलं. तेव्हापासून सतत त्यांच्या आठवणी येत होत्या. त्या गेल्या ते वय  झालं म्हणून ! ९३ वर्षं पूर्ण करणार होत्या.त्यांना कमी ऐकू येत होतं.कंपवात थोडाथोडा जाणवतो आणि तोलही जातो अशी सारखी भीतीही वाटते,म्हणायच्या.
            १५ दिवसांपूर्वीच आजोबा वारले. अगदी त्याच दिवशी संध्याकाळी आजीना दवाखान्यात न्यावं लागलं. नंतर हळुहळू दिवा मंद होत जावा तसं दवाखान्यात त्यांचं सुरु झालं होतं. चक्रदेव आजोबांच्या पाठोपाठ  बरोब्बर १५ दिवसांनी आशाताईनीही हे जग सोडलं आहे.त्या दोघांचं ७५ वर्षांचं एकत्र राहणं झालं, असं समजलं तेव्हा मनात आलं,की ते नाहीत तर आशाताईंचा जगण्याचा उत्साहच संपला की काय ! श्री.चक्रदेव आजोबा येत्या ८ डिसेंबर ला ९८ वर्षाचे होणार तर वाढदिवस साजरा करावा असं त्यांच्या मनात होतं. 
            मी एकदाच त्यांच्या घरी गेले होते. स्वतंत्रपणे दोघंच रहात होते. या वयातही किती प्रसन्न चेहेरा. आजोबा रोज जवळच फिरायलाही जायचे.अगदी वयाच्या ९४-९५ वयापर्यंत.पण एकदा काय कारण झालं नाही माहिती, पण ते फिरताना दिसणं बंद झालं.  त्यांना पाहून फार छान वाटायचं.त्यांच्या घरात एखादी मदतनीस बाई, एखादी विद्यार्थिनी सुद्धा राहत होती, ते त्यांना सोबत म्हणून!
त्यांनी पूर्वी वनिता समाजात काम केलं होतं, आणि त्यामुळे आमच्या मंडळाची नियमावली त्यांनी लिहिली होती.हे समजल्यावर मी अध्यक्ष होताच त्यांनी मला एकदा ते नियम सांगते,पण तुम्हीच या घरी म्हणाल्या. मग मी आणि उपाध्यक्ष मैत्रीण गेलो होतो.घर अगदी नीट लावलेलं,त्यांचं स्वच्छते कडेही लक्ष असणार हे घरात गेल्यावर लगेच जाणवलं होतं. पाणी, अल्पाहार,सरबत सर्व ठरवून,बाईकडून नीट करून घेतलेलं. पण बारकावा लगेच लक्षात येण्याजोगा.त्यांच्या जेवण-झोप या वेळा ठरलेल्या,आणि त्या त्या नक्कीच पाळत असणार.कारण आमची वेळ ठरवताना तसं त्या म्हणाल्याही. 
                 स्वच्छ साडी,नेहेमी नीट घेतलेला पदर !चैत्रागौरी  च्या हळदी-कुंकवाच्या दिवशी तर छान वेगळं कानात,गळ्यात आणि सिल्क ची साडी नेसून त्या आलेल्या आठवतात.कार्यक्रमाला जरी उशिरा आल्या तरी त्यांना ऐकू कमी येई म्हणून त्यांना पुढेच जागा करून देण्याचं मंडळात नेहमीच ठरलेलं होतं.चिठ्ठी उचलून  दिलेल्या विषयावर उत्स्फूर्त बोलणं असो की, एखादा गाण्याचा कार्यक्रम,त्या प्रार्थना होईपर्यंत थांबत,आणि न्यायला बाई येतील तेव्हाच घरी जात असत.
आमच्या वयात एवढं अंतर की त्यांची नातसून साधारण माझ्या एवढी असेल.ती गाण्याचा कार्यक्रम करणार आणि मंडळ शक्य असलेला आणि बाकी मी खर्च करीन असं त्यांनी वर्षभर आधी सांगून ठेवलं होतं.कार्यक्रमाच्या दिवशी नातसूनेच्या कौतुकासाठी  महिला मंडळात आजोबा आलेले चालतील का असं विचारणारा फोन त्यांनी मला केला .अर्थातच जरूर येऊ दे त्यांना. असंच आम्ही सांगितलं.त्यांना ठरवल्याप्रमाणे कार्यक्रम झाला याचं फार फार बरं वाटलं होतं.तब्बेत बरी नसेल तरच त्या मंडळात येत नसत.पण हल्लीच मला कधी कधी जमत नाही असंही सांगत.एकदा तर मैदानावर खेळ घेतले होते,त्या काय खेळणार मी असं म्हणत घरी बसून राहिलंय नाहीत. कुठे होतं आता मैदानावर जाउन येणं,असं म्हणत येऊन बसल्या होत्या.कायम अगदी  नीटस राहणं, मोजकं बोलणं, आणि मुख्य म्हणजे स्वतः बद्दल कमीत कमी बोलणं,अशा विशेष गुणांमुळे त्या माझ्या नेहमीच आवडत्या सभासद होत्या.त्यांच्या आठवणी नाहीत कारण फार सहवासही नाही. पण डोळयांसमोरत्यांचं व्यक्तिमत्वं मात्र सारखं येतंच राहिलं आहे. त्यांचं नीटस,सौम्य स्वभाव आणि ठरवल्याप्रमाणेच करत राहणं हे जमवण्यासाठी त्यांचे आशिर्वाद हवेत.

2 comments: